Sharad Pawar: 'राष्ट्रवादी'ची आजपासून मंडल यात्रा; शरद पवार दाखवणार हिरवी झेंडी, विदर्भातील ११ जिल्ह्यात फिरणार
esakal August 10, 2025 01:45 AM

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलतर्फे उद्या, शनिवारी (ता.९) क्रांती दिनी राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार हिरवी झेंडी दाखवणार आहेत.

ही यात्रा आशिर्वाद लॉन, सीताबर्डी येथून दुपारी साडेबाराला निघेल. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील.

या यात्रेसाठी शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या निवासस्थानी रात्री नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन घेतले. मंडल आयोगाची अंमलबजावणी ही ओबीसींच्या जीवनातील सर्वात मोठी सामाजिक परिवर्तन घडविणारी बाब ठरली.

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू केला होता. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले, याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. मंडल आयोग राज्यात सर्वप्रथम लागू करून शरद पवार यांनी ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले.

Raksha Bandhan 2025: बांबूच्या राख्या गेल्या सातासमुद्रापार; धारणी तालुक्यातील बांबू कला केंद्रात तयार होतात आकर्षक राख्या

ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्वच विरोधी पक्ष करीत होते. परंतु, भाजपने याला विरोध केला. दबाव वाढल्याने केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. परंतु, ही जनगणना कधी करणार याची मात्र, कोणतीही घोषणा केली नाही. भाजपचे ओबीसीविरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य हे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे असे सलिल देशमुख यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.