- rat१०p१०.jpg-
P२५N८३३७२
खेड ः आग्रा येथे पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त अक्षय महाडीक
अक्षय महाडीक यांची सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती
दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण ; ‘युपीएससी’ परीक्षेत देशात २१२ वा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात, हे खेड येथे राहणारे आणि मूळचे दापोली तालुक्यातील माटवण येथील अक्षय संजय महाडीक यांनी दाखवून दिले. दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची आग्रा येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
खेड येथे कृषि अधिकारी म्हणून काम पाहिलेले वडील संजय कृष्णा महाडीक आणि जिल्हापरिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलेल्या आई सरोज महाडीक यांनी अक्षय यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते आयपीएस अधिकारी बनले.
अक्षय महाडीक हा युपीएससी २०२२ परीक्षेत २१२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये दोन वर्ष प्रशिक्षण पूर्ण करुन ५ ऑगस्ट २०२५ रोजी अक्षय याची आग्रा येथे सहाय्यक पोलिस आयुक्त केडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लवेल येथे झाले. तर पुढील शिक्षण एल.पी. इंग्लीश स्कूलमध्ये झाले. माध्यमिक शालांत परीक्षेत ९८.५५ टक्के गुणांसह कोकण बोर्डात प्रथम, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ९३ टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तसेच जेईई परीक्षेत १०७ गुण मिळवून प्रशालेत प्रथम १२ वी उत्तीर्ण झाले. पुढे अक्षय यांनी वाशी येथील फादर एंजल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत बीई (मॅकेनिकल) पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी रवाना झाले. ८ ते ९ महिने दिल्ली येथे व नंतर खेड आणि नेरुळ (नवी मुंबई) येथे पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी देशात २१२ वा क्रमांक पटकावला.
---
कोट १
मुलगा आयपीएस अधिकारी झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. अक्षयने या पदापर्यंत मजल मारल्यामुळे कुटुंबीयांचे आणि गावाचे नाव मोठे केले.
- संजय महाडिक, वडील
कोट २
ग्रामीण भागातील तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मात्र त्या स्वप्नांना आत्मविश्वास, जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही
- अक्षय महाडिक, आयपीएस
---