
आयसीआयसीआय बँकेने 1 ऑगस्ट, 2025 पासून नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे. शहरांमध्ये ही मर्यादा 50,000 रुपये, तर ग्रामीण भागात 10,000 रुपये झाली आहे. यासोबतच बँकेने रोख व्यवहारांवरही शुल्क वाढवले आहे. बँकेचा Q1 FY26 मधील नफा 15.5% नी वाढला असला, तरी या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकूवत वर्गाला खाते उघडणे कठीण होऊ शकते.
देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. 1 ऑगस्ट, 2025 पासून उघडल्या जाणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम आणि रोख व्यवहारांवर शुल्क वाढवण्यात आले आहे.
किमान शिल्लक रकमेतील वाढ:
मेट्रो आणि शहरी भागांसाठी : नवीन बचत खात्यांमध्ये आता किमान 50,000 रुपये सरासरी मासिक शिल्लक (MAMB) ठेवणे आवश्यक आहे, जी पूर्वी 10,000 रुपये होती.
निम-शहरी भागांसाठी : ही मर्यादा 5,000 रुपयांवरून वाढवून 25,000 रुपये करण्यात आली आहे.
ग्रामीण भागांसाठी : ग्रामीण भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम 2,500 रुपयांवरून वाढवून 10,000 रुपये करण्यात आली आहे.
बँकेच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकूवत वर्गाला आयसीआयसीआय बँकेत खाते उघडणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे आता आयसीआयसीआय बँकेचे किमान शिल्लक देशात सर्वाधिक झाले आहे. याची तुलना करताना, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2020 मध्येच किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय श्रीमंत ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेण्यात आला असावा.
व्यवहार शुल्कातही वाढ:बँकेने रोख व्यवहारांसाठी सेवा शुल्क देखील वाढवले आहे.
रोख जमा आणि काढणे: दरमहा 3 विनामूल्य व्यवहारांनंतर प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारले जाईल.
मोठ्या रकमांचे व्यवहार: दरमहा 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार विनामूल्य असतील. त्यानंतर प्रत्येक 1,000 रुपयांवर 3.5 रुपये किंवा 150 रुपये (जे जास्त असेल ते) शुल्क आकारले जाईल.
थर्ड-पार्टी व्यवहार: थर्ड-पार्टी ठेवी आणि रोख काढण्याची मर्यादा प्रति व्यवहार 25,000 रुपये असेल.
ऑफ-आवर्स ठेवी: गैर-कामकाजाच्या वेळेत (संध्याकाळी 4:30 ते सकाळी 9:00) आणि सुट्ट्यांमध्ये ATM मध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केल्यास प्रत्येक व्यवहारावर 50 रुपये अतिरिक्त शुल्क लागू होईल.
बँकेची आर्थिक कामगिरी:या सर्व बदलांदरम्यान, आयसीआयसीआय बँकेने जून तिमाहीत (Q1 FY26) मध्ये मजबूत कामगिरी केली आहे.
निव्वळ नफा : बँकेने 15.5% वार्षिक वाढ नोंदवून 12,768 कोटी रुपयांचा स्टँडअलोन निव्वळ नफा कमावला आहे.
निव्वळ व्याज उत्पन्न : बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 10.6 टक्क्यांनी (वार्षिक आधारावर) वाढून 21,635 कोटी रुपये झाले.
ठेवी आणि कर्जे : एकूण ठेवी 11.2% नी वाढून 15.33 लाख कोटी रुपये झाल्या, तर देशांतर्गत कर्ज पोर्टफोलिओ 12% नी वाढून 13.31 लाख कोटी रुपये झाला.
मालमत्ता गुणवत्ता : एकूण नॉन-परफॉर्मिंग ऍसेट्स 1.67% पर्यंत सुधारले आहेत, जे मागील वर्षी 2.15% होते.
शेअरची कामगिरीशुक्रवारी, आयसीआयसीआय बँकेचा शेअर 0.25% नी घसरून 1,436.40 रुपयांवर बंद झाला, तर सेन्सेक्समध्ये 0.95% ची घसरण झाली होती. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 14% आणि वर्षभरात 23% वाढ दर्शविली आहे.