डहाणू तालुक्यात भातशेती बहरली
पावसाचे प्रमाण कमी असूनही शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कायम
कासा, ता. १० (बातमीदार) ः डहाणू तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भातलावणी पूर्ण झाली असून, तब्बल १६ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
यावर्षी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण केवळ ६२६.९ मिमी इतकेच राहिले, हे मागील पाच वर्षांतील सर्वात कमी आहे. त्यामुळे सुरुवातीला काही काळ लागवड रखडली होती. शेतकरी सुनील पाटील यांनी सांगितले, की आगामी दीड ते दोन महिने पाऊस नियमित झाला, तर उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. भातलागवडीसोबतच बांधावर तूर, वाल, मका यांसारखी आंतरपिके तर मोकळ्या जागेत भेंडी, काकडी, गिलका, शिराळे, माठभाजी, डेटभाजी यांचे उत्पादन घेतले जाते.
चारोटी, कासा, तवा, नानिवली, उर्से, पेठ, ओसरविरा, सोनाळे, वाघाडी, पिंपळेशेत या भागातील अनेक शेतांमध्ये भातशेती सध्या हिरवाईने डुलत आहे. पाऊस कमी असूनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.