परदेशी सफरचंदांना देशीची टक्कर
आवक वाढल्याने भाव ५० टक्क्यांनी घसरले
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : घाऊक फळ बाजारात भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे ३०० ते ४०० रुपये किलो भावाने विक्री होत असलेल्या परदेशी सफरचंदाचे भाव ५० टक्क्यांनी घसरले आहेत.
आंब्यानंतर फळांमध्ये सफरचंदाला सर्वाधिक मागणी असते. भारतीय सफरचंदांचा ऑगस्ट ते डिसेंबर-जानेवारी हा मुख्य हंगाम आहे. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात सफरचंद पाहायला मिळतात. सध्या भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू झाल्याने भाव आवाक्यात आले आहेत. त्यामुळे परदेशी सफरचंदाला मागणी नसल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, हंगामाव्यतिरिक्तही परदेशातून सफरचंद येत असतात. त्यांचा वाहतूक खर्च मोठा असल्याने भारतीय सफरचंदाच्या तुलनेत अधिक महाग असतात, मात्र भारतीय सफरचंद बाजारात १०० रुपये प्रतिकिलोच्या भावात उपलब्ध आहे. सध्या हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची आवक सुरू झाली आहे.
--------------------------------
हंगाम सुरू
- घाऊक बाजारात २० किलोच्या सफरचंदांचे खोके २,५०० ते ४,००० रुपयांपर्यंत मिळते. डिसेंबरपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. आवक वाढली तर भाव आणखी खाली येण्याची शक्यता असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले.
- सिमल्याहून येणाऱ्या किन्नोर जातीच्या सफरचंदालाही मोठी मागणी असते. किरकोळ बाजारात ही सफरचंद १०० ते १३०-१४० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. चांगल्या दर्जाचे सफरचंद १५९-२०० रुपये प्रतिकिलो आहे.