Dhule News : महाराष्ट्रात शिक्षक दिनानिमित्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारात महत्त्वपूर्ण बदल
esakal August 11, 2025 03:45 PM

धुळे: शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव केला जातो. यावर्षी या पुरस्काराच्या निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.

पूर्वी या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना दोन वाढीव वेतनक्रम दिले जात होते. यापुढे राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक लाखाची रोख रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.

पुराव्यांची सखोल छाननी

शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले सर्व पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने अर्ज केल्यास त्यांचे पुरावे गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

पात्रतेसाठी अटी लागू

शिक्षक अथवा मुख्याध्यापकाची एकूण सेवा किमान दहा वर्षे असावी. मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी, याचे प्रमाणपत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून सादर करणे बंधनकारक आहे. शिक्षकाच्या मागील पाच वर्षांच्या कार्याचे गुणांकन पद्धतीने जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यांकन होईल.

प्रस्तावित शिफारशी

जिल्ह्यात प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग आणि आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी प्रत्येकी तीन क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका एक, विशेष शिक्षक (कला-क्रीडा) प्रत्येकी एक, दिव्यांग शिक्षक-दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एक शिक्षक व स्काऊट/गाईड कार्य करणारे दोन शिक्षक पुरस्कारासाठी शिफारशी प्रस्तावित असतील.

प्रतिनियुक्तीवर कार्यरत शिक्षकांची अर्जे ग्राह्य धरली जाणार नाहीत. एकदा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्यास, पुन्हा त्या शिक्षकास राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही. तसेच, एकाच शिक्षकाने केवळ एका संवर्गासाठी अर्ज करावा. एकापेक्षा पेक्षा अधिक संवर्गात अर्ज आल्यास ते अर्ज बाद करण्यात येतील.

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये लाडक्या गणरायाचे आगमन; नियमांनुसार मंडप उभारणी

निवड प्रक्रिया समिती

जिल्हा निवड समितीत पुढील सदस्यांचा समावेश असेल : प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था- अध्यक्ष, जिल्हाधिकारी नामनिर्देशित शैक्षणिक सदस्य- सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी नामनिर्देशित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक- सदस्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)- सदस्य सचिव.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.