आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, शिवसेनेच्या वतीनं जम्मू इथल्या एम्स रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, दरम्यान जम्मूमधील एम्स रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी एकनाथ शिंदे निघाले असताना अचानक हवामान खराब झालं. हवामान खराब झाल्यामुळे आर्मीच्या पायलटनं एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरने उड्डाण न करण्याचा सल्ला दिला, मात्र त्यावेळी जे घडलं त्याचा किस्सा चंद्रहार पाटील यांनी सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रहार पाटील?
एअरफोर्स पायलटनं हवामान खराब झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुढे जाऊ नका, असा सल्ला दिला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी पायलटचं न ऐकता महारक्तदान कार्यक्रमाला पोहचायचं म्हणत पायलटला हेलिकॉप्टर उडवायला सांगितलं.
त्यावेळी त्या हेलिकॉप्टरचा पायलट शिंदेंना म्हणत होता, साहेब बसू नका. त्यावेळी साहेब त्याला बोलताना म्हणाले की, वर गेल्यानंतर ठरवू. हेलिकॉप्टरनं उड्डाण करताच आम्ही प्रचंड घाबरलो. पण एकनाथ शिंदे घाबरले नाहीत. एकनाथ शिंदे म्हणाले हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर बघू, पण वर गेल्यावर काय बघणार असा मनात विचार आला आणि घाबरलो, असं यावेळी चंद्रहार पाटील यांनी सांगतिलं.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, विमानातून येत असताना वरून वैष्णव देवीचं मंदिर दिसलं, येता-येता वरतूनच वैष्णव देवीचं दर्शन घेतलं, साहेबांकडे पाहिलं तर त्यांनी आधीच पायातले बूट काढलेले होते. तेव्हाच वाटलं की मी देवासोबत काम करत आहे, आम्ही विशाखा पट्टणम येथे देखील रक्तदान करणार आहोत. आज आपण देशासाठी काम करत आहोत, असंही यावेळी चंद्रहार पाटील यांनी म्हटलं.
शिवसेनेचं महाराक्त दान हे देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. इथे आलेल्या सर्व रक्त दात्यांचं अभिनंदन करतो, आम्ही वर्षभर हा उपक्रम राबवणार आहोत. जम्मू येथे येऊन असं रक्तदान करण कोणाचही काम नाही. ग्रामीण भागात आजही रक्ताची कमी आहे, हाच विचारा करून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असं यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले.