Asia Cup 2025 : इंडिया-अफगाणिस्तान एका गटात नसूनही राशीद-हार्दिक भिडणार, ऑलराउंडरमध्ये प्रतिष्ठेची लढाई, नक्की काय?
GH News August 11, 2025 08:14 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने 2 आघाडीच्या ऑलराउंडरमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि अफगाणिस्तानचा अष्टपैलू राशीद खान या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आशिया कप स्पर्धेसाठी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या दोन्ही खेळाडूंची आशियातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

हार्दिक पंड्या आणि राशिद खान यांच्यात थेट लढत

आशिया कप स्पर्धेत यंदा एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्य विभागण्यात आलं आहे. त्यानुसार भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा अ गटात समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका,अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँगचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. भारत-अफगाणिस्तान दोन्ही संघ एका गटात नाहीत. मात्र त्यानंतरही या 2 क्रिकेट संघातील ऑलराउंडरमध्ये टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्ससाठीच्या विक्रमासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. त्यामुळे टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा बहुमान मिळवण्यासाठी हार्दिक-राशीद यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. राशीद आणि हार्दिक या दोघांच्या नावावर टी 20 फॉर्मटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत समसमान विकेट्सची नोंद आहे.

भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड सर्वातआधी कोण ब्रेक करणार?

हार्दिक आणि राशीद या दोघांनी टी-20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात प्रत्येकी 8-8 सामन्यांमध्ये 11-11 विकेट्स मिळवल्या आहेत. या दोघांना टी 20 आशिया कप स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी प्रत्येकी 3-3 विकेट्सची गरज आहे. आशिया कप स्पर्धेत (टी 20) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हा भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या नावावर आहे. भुवीने 6 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता हार्दिक आणि राशिदपैकी हा रेकॉर्ड कोण मोडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.