Pune Smart City : बालेवाडीत स्मार्ट स्वच्छतागृहाचे काम सुरू, पुण्यात पाच ठिकाणी बांधणार; चार कोटी ३१ लाखांचा खर्च
esakal August 11, 2025 10:45 PM

पुणे : नागपूरच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्मार्ट स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्याच धर्तीवर पुणे महापालिका पाच ठिकाणी शहराच्या प्रवेशद्वारांवर अशी स्वच्छतागृहे बांधणार आहे. यातील पहिल्या स्वच्छतागृहाचे काम बालेवाडीत सुरू झाले आहे, तर शेवाळवाडी व वाघोली येथील स्वच्छतागृहांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. एका स्वच्छतागृहाचा खर्च सरासरी ७५ लाख रुपये इतका आहे.

शहराच्या प्रवेशद्वारांवर स्मार्ट स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आला असून, पाच स्वच्छतागृहांसाठी ४ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी, स्वारगेट बसस्थानक, बालेवाडी, कात्रज चौक आणि नगर रस्त्यावरील वाघोली येथे ही टॉयलेट्स उभारण्यात येणार असून, प्रत्येकाचा खर्च ७० ते ७५ लाख रुपये अपेक्षित आहे. स्वारगेट आणि बालेवाडी येथील प्रकल्पांना यापूर्वीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. बालेवाडीतील काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती घनकचरा विभागप्रमुख संदीप कदम यांनी दिली. शेवाळवाडी आणि वाघोली प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर असून, कात्रज चौकातील प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या आहेत सुविधा...
  • पूर्ण वातानुकूलित स्वच्छतागृह

  • अंघोळीसाठी अद्ययावत बाथरूम व चेंजिंग रूम

  • मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स व वायफाय सुविधा

  • महिला, पुरुष आणि तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र सुविधा

  • अपंगांसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था

  • केअरटेकर व स्वच्छता कर्मचारी कायम हजर

सामाजिक संस्थांचा आक्षेप

मोजक्या पाच स्वच्छतागृहांवर महापालिका साडेचार कोटी रुपये खर्च करत आहे. त्यापेक्षा सतत स्वच्छता केली जाईल अशी साधी किमान २० स्वच्छतागृहे उपलब्ध केली तर ती नागरिकांसाठी जास्त सोयीची असतील. नागरिकांच्या कराचे पैसे अशा पद्धतीने उधळणे योग्य नाही, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. जास्त खर्चिक सुविधा केवळ कंत्राटदारांच्या फायद्याच्या ठरतात, अशी टीका आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.