Pinakeshwar Mahadev Temple: अजिंठा डोंगररांगेतील पिनाकेश्वराचे मंदिर; श्रावणातील तिसऱ्या सोमवारी कावड यात्रेकरू करतात जलाभिषेक
esakal August 11, 2025 10:45 PM

संतोष निकम

अजिंठा, सातमाळा डोंगररांगेतील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेले पिनाकेश्वर (मोठा) महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात दररोज व दर सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

तिसऱ्या श्रावण सोमवारी तर लाखो कावड यात्रेकरू वेरूळ येथील अहिल्यादेवी होळकर येथील शिवतीर्थाचे व वैजापुर तालुक्यातील वाजंरगाव (सरला बेट) येथील गोदावरी यासह इतर पवित्र नद्यांचे जल कावडीने पायी चालत येऊन पिनाकेश्वर येथील शिवलिंगाचा जलाभिषेक करतात. संपूर्ण श्रावण मासात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविक श्रद्धेने नवस फेडण्यासाठी दाळ-बट्टी, रोडग्याचा नैवेद्य पिनाकेश्वराला अर्पण करतात.

मंदिराचा जिर्णोद्धार

वर्ष १९६१-६२ च्या सुमारास राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामींचे अंदरसुल येथून थेट पिनाकेश्वर डोंगरावर आगमन झाले. वर्ष १९६४ मध्ये येथील प्राचीन लाकडी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प संत जनार्दन स्वामी यांनी केला. संत जनार्दन स्वामींच्या प्रेरणेने शिवभक्तांच्या श्रमदानातून दगडी मंदिराचे काम पूर्ण केले. १९६७ मध्ये संत जनार्दन स्वामींनी मंदिरात नवीन मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचा केलेला संकल्प पूर्ण केला. ब्र.प.पू.गंगागिरी महाराजांनी सभामंडप, गोशाळा, भंडारघर आदींचे कार्यही पूर्ण केले.

कावड यात्रेकरूची सेवा

दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लाखो शिवभक्त वेरूळ, वाजंरगाव यासह इतर पवित्र नदी, जलाशयाचे पाणी घेऊन भाविक मनोभावे कावड यात्रेत सहभागी होऊन पिनाकेश्वर डोंगरावर जातात. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी वेरूळ येथून येणाऱ्या कावड यात्रेकरूंसाठी गेल्या कित्येक वर्षापासून गल्ले बोरगाव, औराळा, जेहूर, टाकळी, केसापूर, आलापूर, या महाप्रसादाचे, चहा, नाश्ता, फलाहार आदी व्यवस्था करण्यात येते.

Chandrashekhar Bawankule: कोराडी येथील घटनेची उच्चस्तरीय चौकशी; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, घटनास्थळाची केली पाहणी अशी आहे आख्यायिका

पिनाकेश्वर महादेव देवस्थान हे प्राचीन असून या संदर्भात वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना नाशिककडे जात असताना त्यांचे या ठिकाणी मुक्काम झाला. प्रभु रामचंद्र हे शिवभक्त असल्याने त्यांनी या ठिकाणी शिवपूजा केली. महादेवांनी प्रसन्न होऊन ''पिनाक''अस्र प्रभु रामचंद्रांना दिले. त्यामुळे हे स्थान पिनाकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.