आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईतील 2 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी सहभागी संघांनी कंबर कसली आहे. एका बाजूला निवड समितीचं कुणाला संधी द्याची आणि कुणाला नाही? यावर लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला खेळाडू जोरदार सराव करत आहेत. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या निमित्ताने या टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.
टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा बांगलादेशचा माजी वेगवान गोलंदाज मशरफे मुर्तझा याच्या नावावर आहे. मशरफेला 5 पैकी 3 वेळा खातंही उघडता आलं नाही. मशरफेने या स्पर्धेत एकूण आणि फक्त 14 धावा केल्या. तसेच श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याचीही टी 20 आशिया कप स्पर्धेतील ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. चरिथ या स्पर्धेत एकूण 2 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तसेच चरितला 4 सामन्यांमध्ये फक्त 9 धावाच करता आल्यात.
या यादीत टीम इंडियाच्या एका खेळाडूचा समावेश आहे. स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या टी 20i आशिया कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा खेळाडू आहे. हार्दिक या स्पर्धेतील 6 सामन्यांपैकी 2 वेळा झिरोवर आऊट झाला आहे. हार्दिकने 16.6 च्या सरासरीने 83 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा माजी फलंदाज विराट कोहली हा देखील झिरोवर आऊट झाला आहे. विशेष म्हणजे विराट टी 20 आशिया कप स्पर्धेत झिरोवर आऊट होणारा आणि शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघाचं विभाजन 4-4 अशा पद्धतीने 2 गटात करण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि ओमान या संघांचा समावेश करण्यात आला आहे. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि हाँगकाँग आहे. दोन्ही गटातून 2 अव्वल संघ सुपर 4 मध्ये पोहचतील. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 19 सामने होणार आहेत.