तळगड किल्ल्याची दुरवस्था
गडप्रेमींमध्ये नाराजी; पर्यटन विकासाची मोठी संधी
तळा, ता. ११ (बातमीदार) ः तळा तालुक्याला लाभलेला एक अनमोल ऐतिहासिक वारसा म्हणजे तळगड किल्ला, मात्र सध्या या गडाची दुरवस्था झाली असून, गडप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासन अशा ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसराचा पर्यटनामध्ये विकास होणार कसा, असा सवाल केला जात आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फूट उंचीवर वसलेला आणि तळा गावाच्या सुमारे ४०० फूट उंच टेकडीवर तटबंदी केलेला हा गड, आपल्या रांगड्या आणि देखण्या रूपामुळे इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील क्र. १७ पासून फक्त १५ किमी अंतरावर असलेला तळगड, निसर्गरम्य टेकड्या, खोल दऱ्या आणि घनदाट वनराजीच्या सान्निध्यात उभा आहे. गडाच्या पूर्वेकडून चढाईचा मार्ग असून, मधोमध एका जुन्या चौकीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. या चौकीतून शत्रूवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था होती, तसेच तोफेसाठी खास चौथरा बांधलेला होता. तटबंदीपर्यंत पोहोचवणाऱ्या जुन्या पायऱ्या आज जीर्णावस्थेत असल्या तरी इतिहासाचे मोलाचे साक्षीदार आहेत.
इतिहासकार सांगतात की, आदिलशाहीच्या राजवटीला कंटाळून एका मराठा किल्लेदाराने तळगड आणि घोसाळे किल्ले शिवरायांना अर्पण केले. यामुळे कोकणातील समुद्रकिनारा पाहण्याची संधी शिवाजी महाराजांना मिळाली. १६६५ च्या पुरंदर तहानंतर केवळ १२ किल्ले शिवरायांच्या ताब्यात राहिले, त्यात तळगड आणि घोसाळेचा समावेश होता. १७३५ मध्ये बाजीराव पेशव्यांनी गड गमावला, मात्र त्याच वर्षी तहामध्ये तो पुन्हा मिळवला. शेवटी १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर त्याचे दरवाजे उद्ध्वस्त करण्यात आले.
.....................
योग्य विकास आराखड्याची गरज
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने गडावर प्रथम ध्वजारोहण केले जाते. २००९-२०१० मध्ये हरीभाऊ चांडीवकर यांनी तरुणांना एकत्र करून महाशिवरात्री उत्सव सुरू केला, ज्यामुळे गडाबद्दल जनजागृती वाढली. ‘श्री जय हरी सेवा मंडळ’ दरवर्षी गडावर जाणारी पायवाट दुरुस्त करते आणि संवर्धनासाठी प्रयत्न करते. गडाचे सुशोभीकरण आणि जतन केल्यास तळगड हे एक आकर्षक पर्यटनस्थळ बनू शकते. सध्या गडावरील अनेक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ज्यांना तातडीने डागडुजीची गरज आहे. पुरातत्त्व खात्याने आणि शासनाने याकडे लक्ष देऊन योग्य विकास आराखडा राबविल्यास, तळगड केवळ तळा तालुक्याचा अभिमानच नव्हे तर संपूर्ण कोकणाचे एक प्रमुख पर्यटनकेंद्र ठरेल.