Latest Marathi News Updates : प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात सुनावणी
esakal August 13, 2025 01:45 PM
Pune Live : प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात सुनावणी

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना जामीन भेटावा यासाठी वकिलांकडून पुणे न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे या अर्जावर आज दुपारी तीन वाजता सुनवानी होणार आहे. न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur News : अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी जाहीर

गडहिंग्लज : अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या फेरीसाठी पहिले तीन विकल्प सक्तीचे आहेत. या यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवार (ता. १४) अखेर संबधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रे आणि शुल्क घेऊन प्रवेश निश्चित करायवयाचा आहे. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

Suresh Raina News : माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED चे समन्स; बेटिंग अॅप प्रकरणी आज होणार चौकशी

टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाला ईडीने समन्स बजावलंय. आज ईडीने रैनाला चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात बोलावलं आहे. संघीय तपास संस्था बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात ईडी त्याचं म्हणणं नोंदवणार आहे. सुरेश रैनाची बेटिंग अॅप प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. आता ईडीने त्याला समन्स बजावले असून बेटिंग अॅप प्रकरणी आज त्याची चौकशी होणार आहे.

Shivaji Vidyapeeth : शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे दोन वर्षांतून एकदा देण्यात येणारा प्रा. डॉ. जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना मंगळवारी जाहीर करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण २० ऑगस्टला होणार आहे.

kolhapur News : न्यू शाहूपुरीत फ्लॅट फोडून ५० तोळे सोन्यावर डल्ला

कोल्हापूर : न्यू शाहूपुरीतील अनंत प्रेस्टीज इमारतीतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ५० तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याच्या अलंकारांवर चोरट्यांनी डल्ला मारला. सोमवारी सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान भरदिवसा हा प्रकार घडला. चिंचोळ्या बोळातील इमारतीत माहितगारांकडूनच चोरी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सीपीआरमधील मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अनिता अरुण परितेकर यांनी फिर्याद दिली.

Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे-पाटील 15 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुरू

29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुद्धा सुरू आहेत.

Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात, खातुश्याम मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. खातुश्याम मंदिराचे (Khatu Shyam Temple) दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला मोठ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात ७ लहान मुलं आणि ३ महिलांचा समावेश आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इथे क्लिक करा...

Bachu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडूंना तीन महिने कारावास

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरविले. या प्रकरणात त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ‘कडू आमदार होते म्हणजे त्यांना मारहाण करण्याचा परवाना मिळाला असे नाही,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

Ambabai Temple News : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण; उद्यापासून दर्शन पूर्ववत होणार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया आज पूर्ण झाली. त्यामुळे गुरुवारी (ता. १४) दुपारी बारापासून मुख्य मूर्तीचे दर्शन पूर्ववत केले जाणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

Police Recruitment News : राज्यात पोलिसांची मेगा भरती; शिपायांच्या १५ हजार जागांना मंजुरी

Latest Marathi Live Updates 13 August 2025 : राज्यातील वाढत्या राजकीय आणि इतर घडामोडींमुळे पोलिस दलावरील कामाचा ताण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या दलाला दिलासा देणारा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. पोलिस दलातील शिपाई पदाच्या १५ हजार जागा भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीये. तसेच शासकीय निवासस्थानी जळालेल्या अवस्थेतील बेहिशोबी नोटा सापडल्याने अडचणीत आलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे. मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा अखिलेश यादव यांनी केली आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून २९ ऑगस्ट रोजी जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.