ध्वजारोहणावरून वादाची ठिणगी
आदिती तटकरे यांना मान, शासनाचे परिपत्रक जारी
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर)ः रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना, राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच राज्य सरकारने परिपत्रक काढून जिल्हा मुख्यालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने मंत्री भरत गोगावले यांना पुन्हा वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना, राष्ट्रवादीत वाद आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देऊ नये, अशी आग्रही मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. महाडचे आमदार फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. पालकमंत्रिपदाचा वाद दिल्ली दरबारीदेखील पोहोचला आहे. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत विचारणा केली जाते. त्या वेळी वेळ मारून नेण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न असताना राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
------------------------------------------------
गोगावलेंची संधी पुन्हा हुकली
मंत्री भरत गोगावले यांनी या वेळी ध्वजारोहणाची संधी मला मिळेल, असा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला होता. पालकमंत्रिपदही मला मिळेल, असे वारंवार ते म्हणत आहेत. ध्वजारोहणची यादी म्हणजे पालकमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले, असे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा रायगडमधील राष्ट्रवादी, शिवसेना आमने-सामने येणार आहे.