केवळ मथुरा आणि वृंदावनच नाही तर 'या' ठिकाणांची जन्माष्टमी होते मोठ्या उत्साहात साजरी
Tv9 Marathi August 14, 2025 05:45 AM

कृष्ण जन्माष्टमी-गोपाळकालाचा दिवस काही दिवसांवर येऊन ठेपलाय, आणि या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी जय्यत तयारीला सुरूवात झालीय. तर यावर्षी जन्माष्टमीचा पवित्र सण 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. देशभरात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. याशिवाय, जन्माष्टमीच्या दिवशी विविध ठिकाणी देखावे उभारले जातात आणि नाटकाद्वारे कृष्णलीला दाखवल्या जातात. मंदिरे अतिशय सुंदरपणे सजवली जातात. धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरा आणि त्यांच्या लीलेचे ठिकाण वृंदावन या दोन्ही ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. पण तुम्हाला माहित आहे का की, देशात अनेक ठिकाणी जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मथुरा आणि वृंदावन व्यतिरिक्त इतर कोणत्या ठिकाणी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

द्वारका

मथुरा आणि वृंदावन व्यतिरिक्त गुजरातमधील द्वारका येथे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तुम्ही या ठिकाणी जाण्याचा विचार देखील करू शकता. हे ठिकाण भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित आहे, म्हणून द्वारका हे भक्तांना खूप प्रिय आहे. तुम्ही द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येथे जाऊ शकता.

पुरी

ओडिशातील पुरी येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. भगवान जगन्नाथ यांना यादिवशी 56 प्रकारचे भोग आणि पंचामृत प्रसाद अर्पण केले जाते. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर फुले आणि दिव्यांच्या रोषणाईने सजवलेले जाते. तसेच येथील श्रीकृष्ण लीलाचे देखावे खूपच सुंदर असतात. जन्माष्टमीला तुम्ही पुरीला जाण्याचा प्लॅन करू शकता.

कुरुक्षेत्र

कुरुक्षेत्र हे ते ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाने अर्जुनला भगवद्गीता सांगितली होती. जन्माष्टमीच्या दिवशी येथे अनेक भाविक येतात. मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या पराक्रमांचे वर्णन करण्यासाठी धार्मिक कार्यक्रम जसे की चित्रकला आणि सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करत असतात.

बरसाणा

बरसाणा हे राधा राणीचे जन्मस्थान मानले जाते. येथेही जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथील मंदिरांची सजावट तुमचे मन मोहून टाकते. कृष्ण लीला दर्शविणारे देखावे, नाटके आणि नृत्ये तुम्हाला कृष्णाच्या त्या काळात परत घेऊन जातील. बरसाणा मथुरेपासून सुमारे 50 किमी आणि वृंदावनपासून सुमारे 45 किमी अंतरावर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.