अरे हा चुलता आहे की कसाई? पोरगी कॉलेजात गेल्यावर प्रेमात पडेल म्हणून जीवच घेतला; अख्खा देश हादरला
Tv9 Marathi August 14, 2025 07:45 AM

गुजरातच्या बनासकांठा येथे हॉनर किलिंगचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 18 वर्षाची चंद्रिका चौधरी ही शासकीय मेडिकल कॉलेजात प्रवेश घेणार होती. पण तिच्याच कुटुंबीयांनी तिला जीवे मारलं. हे हॉनर किलिंगचं प्रकरण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून तिचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गुजरात हादरून गेला आहे.

काही दिवसानंतर गुजरात उच्च न्यायालयात चंद्रिकाचा पार्टनर हरेशकडून दाखल करण्यात आलेल्या हेबियस कॉर्पसच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण त्यापूर्वी चंद्रिकाची हत्या करण्यात आली. चंद्रिकासाठी तिचा पार्टनर कोर्टात गेला होता. कारण चंद्रिकाचा काहीच संपर्क होत नव्हता. तिचे कुटुंबीय तिच्याबद्दलची कोणतीही माहिती देत नव्हते.

वाचा: निर्लज्जपणाचा कळस! भर दिवसा शिवाजी पार्कमध्ये किळसवाणे कृत्य, Video पाहून तुमचाही राग होईल अनावर

चंद्रिका प्रचंड हुशार होती. तिने रात्र न् दिवस मेहनत करून नीटच्या परीक्षेत 478 मार्क मिळवले होते. तिला सरकारी मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळणार असल्याचं निश्चित होतं. पण तिच्या घरच्यांना तिच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या इज्जतीची अधिक काळजी होती. त्यातूनच हे महाभयंकर हत्याकांड झालं.

तर पोरगी प्रेमात पडेल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिकाचा काका शिवराम चौधरी यांनी काही कॉलेज पाहिले होते. मुलं मुली कॉलेजात एकत्र शिकत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. चंद्रिकाही कॉलेजात गेली तर एखाद्या मुलाच्या प्रेमात पडेल. त्याच्याशी लग्न करेल, त्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल, असं शिवरामने चंद्रिकाच्या वडिलांना सांगितलं. त्यामुळे चंद्रिकाचा फोनही हिसकावून घेण्यात आला. तिला सोशल मीडियापासून दूर ठेवलं गेलं. फक्त घरातील कामालाच तिला जुंपण्यात आलं.

दूधात गुंगीचं औषध…

एफआयआरच्यानुसार 24 जून रोजी शिवरामने चंद्रिकाच्या वडिलांच्या सांगण्यावरून चंद्रिकाच्या दूधात गुंगीचं औषध मिसळलं. त्यानंतर चंद्रिका बेशुद्ध पडली. चंद्रिका बेशुद्ध पडताच तिला स्टोअर रूममध्ये नेलं आणि तिचा ओढणीने गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांनी चंद्रिकाने आत्महत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हार्ट अटॅक आल्याचा बहाणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरामने गावातील काही लोकांना चंद्रिकाला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं. तर काहींना सांगितलं की तिने आत्महत्या केली. कोणीच खरी गोष्ट कुणाला सांगितली नाही. 25 जून रोजी चंद्रिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर चंद्रिकाचा पार्टनर हरेशने कोर्टात दिलेल्या याचिकेनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. संपूर्ण प्लान करून तिची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. सध्या चंद्रिकाचा बाप फरार आहे. तर काका पोलीस कोठडीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.