चिमूर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या तालुक्यातील जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. नऊ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, शिळ्या अन्नातून हा प्रकार घडल्याचा आरोप पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समितीने केला आहे. दरम्यान, पाणी आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याच्या अहवालानंतर नक्की कारण समोर येईल.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे आदिवासी शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. तालुक्यातील जांभूळघाट येथे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहे. शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ११ ऑगस्टला आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. मुलींना रक्ताच्या उलट्या ,हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागले.
दरम्यान, पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समितीच्या सदस्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली. तेव्हा शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली. एकावेळेस अनेक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.त्यातील वेदीका चौधरी, राजेश नानाजी राजनहिरे, ऋतुजा आशीष चौधरी, चांदणी इदरशहा सिडाम, स्नेहा नरेंद्र गायकवाड, मोनाली अनिल धुर्वे, सरवरी केशव दोडके, शिवाणी अंकोष चौधरी, अंजली उमेश फरंदे या नऊ विद्यार्थ्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जांभुळघाट येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.रात्री भेट दिली असता तिथे एकही शिक्षक नव्हते. शिळ्या अन्नाने विषबाधा होऊन विद्यार्थ्यांची प्रकृती खराब झाल्याची एकंदरीत शाळा भेटीत माहिती मिळाली आहे. याप्रकरणी योग्य चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी.
भाऊजी टेकाम, अध्यक्ष पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समिती चिमूर
विद्यार्थ्यांना व्हायरल झाले असून सगळ्या रिपोर्ट नार्मल आल्या आहेत. डेंगु, मलेरीया, कोविळ , टायफाईड इत्यादी सर्व तपासण्या केल्या आहेत.a
प्रवीण लाटकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, चिमूर