पंढरपूर : फिर्यादीच्या घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने चोरी करून लंपास केलेले ८ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी मोठ्या शिताफीने जप्त केले. या प्रकरणी एकमेव साक्षीदार असलेली महिलाच चोर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
साक्षीदार महिला ही फिर्यादीच्या राहत्या घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करीत होती. चोरी झाल्यानंतर संशयित आरोपी महिलेने माहिती दिली की, सदर घरामध्ये एक व्यक्ती तोंडाला मास्क बांधून डोक्यावर कॅप घालून स्पोर्ट मोटारसायकलवरून आला. त्याने घरामध्ये घुसून चोरी केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता सदर वर्णनाबाबत कोठेही व काही एक पुरावा मिळून आला नाही. गोपनीय बातमीदाराकडून वरील वर्णनाच्या आरोपीबाबत काहीएक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांना काही तरी गडबड असल्याचा संशय आला.
पोलिसांनी सदर महिलेला विश्वसात घेवून तपास केला असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर फिर्यादीच्या घरातून चोरीला गेलेले ८ लाख ८० हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीचे वस्तू असा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रशांत डगळे, यांचे सूचनेनुसार पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केली.