वाठार स्टेशन: येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल परत मिळवले आहेत. हे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीला किंवा हरवले होते. आता ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी, की येथील परिसरातून अनेक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या.
या पथकातील कर्मचाऱ्यांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतून चोरीचे मोबाईल वापरणाऱ्याशी वारंवार संपर्क करून ही मोहीम राबविली. पोलिसांनी गहाळ झालेले २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल हस्तगत करून ते मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आले.
याच्या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलिस हवालदार तानाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, गणेश इथापे, प्रतीक देशमुख, महिला पोलिस ज्योती कदम यांचा समावेश होता.