Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड
Saam TV August 13, 2025 01:45 PM

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात देखील मतदार यादीतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामध्ये, एकाच घरात ११९ मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्या घरात प्रत्यक्षात केवळ दोन मतदार राहतात.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असून, यामुळे मतदार यादीतील अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मतदार यादीतील घोटाळा चंद्रपूरजिल्ह्यातही समोर आला आहे. घुग्गुस या गावात एकाच घरात ११९ मतदारांची नोंद सापडली आहे. मुळात या घरी केवळ दोन मतदार आहेत. असे असताना इतक्या मोठ्या संख्येने मतदार आले कोठून हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

Risod Nagar Parishad : रिसोड प्रभाग रचनेची माहिती मुदतीच्या अगोदरच व्हायरल; माहिती बाहेर आल्याने खळबळ

यादी तपासणीत समोर आला प्रकार 

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे. या गावात सचिन बांदुरकर यांचे ३५० क्रमांकाचे घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल ११९ जणांची नोंदणी झाली आहे. या मतदारांचा घर क्रमांक हा ३५० आहे. एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

घर मालकही अनभिन्न 

दरम्यान मतदार यादीत वाढविण्यात आलेले मतदार असलेले हे कोण लोक आहेत, त्यांची नोंदणी कुणी केली? तसेच नोंद कुणी केली असेल, त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही का, की हे बोगस मतदार आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ही माहिती समोर आल्यावर घर मालक देखील चकित झाले. तर काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.