Traditional Russian Salad origin story: अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे रशियन सॅलड हा एक पारंपरिक रशियन पदार्थ असून, त्याची सुरुवात मॉस्को शहरातील हर्मिताज रेस्टॉरंटमध्ये झाली. त्याचे भागीदार ऑलिव्हियर यांनी तिथे एक आगळेवेगळे सॅलड बनवले. त्यात त्यांनी ग्राऊसचे मीट, कॅव्हियार, स्मोक्ड डक आणि काही खास पदार्थ वापरून बनवलेले ड्रेसिंग वापरले. अल्पावधीतच सॅलड इतके लोकप्रिय झाले, की ते खाण्यासाठी लोक मुद्दाम ऑलिव्हियरच्या रेस्टॉरंटला भेट देऊ लागले. हे सॅलड हर्मिताज रेस्टॉरंटची ‘सिग्नेचर डिश’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
ऑलिव्हियर हे सॅलड अगदी कलात्मक रितीने सजवत असत. काही दिवसांनी त्यांच्या असे लक्षात आले, की त्यांनी प्रयत्नपूर्वक नटवलेले सॅलड लोक काट्याने एकत्र करतात आणि मगच आपल्या बशीत वाढून घेतात. हे बघून त्यांना धक्का बसला; पण अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांनी स्वत:च सॅलडमधील सर्व पदार्थ एकत्र करून ते सर्व्ह करण्यास सुरूवात केली.
मेयॉनीज वापरून केलेले ड्रेसिंग ही खरी त्या उत्कृष्ट चवीच्या सॅलडमधील मेख होती. त्यासाठी ऑलिव्हियरनी फ्रेंच वाईन व्हिनेगर, उत्तम प्रतीचे ऑलिव्ह ऑईल, इंग्लिश मस्टर्ड असे पदार्थ वापरले. इतर पदार्थही खूप महाग आणि सहजासहजी न मिळणारे असे होते. ऑलिव्हियरने सॅलडची रेसिपी गुप्त ठेवली. हर्मिताजमधील इतर शेफनी हे सॅलड बनवण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही.
ऑलिव्हियरचे अवघ्या पंचेसाळीसाव्या वर्षी निधन झाले आणि त्यानंतर हर्मिताज रेस्टॉरंट बंद पडले. रशियन लोकांनी मूळ सॅलडमध्ये कोणकोणते पदार्थ वापरले होते, याचा नाना प्रकारे शोध घेतला. ऑलिव्हियर आपल्या सॅलडमध्ये जे पदार्थ वापरत असत, त्या पदार्थांना त्यांनी पर्यायी पदार्थ शोधले. सॅलडमध्ये ग्राऊस मीटऐवजी चिकन, केपर्सऐवजी ऑलिव्हज, स्मोक्ड डकऐवजी हॅमचे चौकोनी तुकडे असे पदार्थ वापरले. त्यातील कॅव्हियर आणि क्रेफिश वगळले. भाज्यांपैकी लेट्युस, बटाटे आणि गाजर; तसेच ठेवून त्यात काकडी व मटारच्या दाण्यांचा सामावेश केला. या सर्वांच्या जोडीने त्यात सफरचंदाचे तुकडे व उकडलेली अंडीही वापरली. सॅलड ड्रेसिंगमध्ये मात्र त्यांना फारसा बदल करता आला नाही
असे अनेक बदल केल्यामुळे व पर्यायी पदार्थ वापरल्यामुळे नवीन सॅलड हे मूळ सॅलडपेक्षा जरा निकृष्ट दर्जाचे आणि वेगळ्या चवीचे बनले. मात्र, रशियन लोक ऑलिव्हियरना मान देण्यासाठी व त्यांची आठवण म्हणून आजही त्या सॅलडला ‘ऑलिव्हियर सॅलड’ असेच म्हणतात.
रशियात त्याला ऑलिव्हियर सॅलड म्हटले जात असले, तरी त्याचा उगम रशियातला असल्यामुळे जगभरात ते रशियन सॅलड म्हणूनच ओळखले जाते. हे सॅलड सर्व देशांत विविध स्वरूपात पाहायला मिळते. ते चविष्ट, तयार करायला सोपे आणि सहज उपलब्ध घटकांपासून बनवले जाते, म्हणूनच गृहिणींपासून हॉटेलमधील शेफपर्यंत हे सॅलड सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहे. नवीन स्वरूपातले रशियन सॅलड हे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात बनवता येते.
या सॅलडची अजून एक खासियत म्हणजे ते आधीपासून तयार करून थंड सर्व्ह करता येते. त्यामुळे ते पिकनिक, पारंपरिक जेवण किंवा सणावारासाठी आदर्श ठरते. ते मुख्य जेवणासोबत खाल्ले जाते किंवा नुसतेही खाल्ले जाते. मेयॉनीजमुळे हे सॅलड थोडे जड होत असले, तरी त्याऐवजी ग्रीक योगर्ट किंवा लो-फॅट चक्का किंवा सावर क्रीम वापरल्यास ते कमी कॅलरीयुक्त आणि हलके होते. अतिशय आरोग्यदायी अशा या सॅलडमधील मीटमुळे भरपूर प्रथिने व भाज्यांमुळे भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. असे हे ऑलिव्हियर सॅलड पारंपरिक रशियन खाद्यसंस्कृतीमधला महत्त्वाचा पदार्थ असून, आज आपण ज्याला ‘रशियन सॅलड’ म्हणतो ते त्याचेच आधुनिक रूप आहे.