क्रिकेट विश्वात सध्या युवा खेळाडूंची चलती पाहायला मिळत आहे. युवा खेळाडूंना आयपीएल आणि इतर फ्रँचायजी क्रिकेटमुळे आपल्यातील प्रतिभा दाखवून देण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. अनेक खेळाडूंनी या फ्रँचायजी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत झेप घेतलीय. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या आणि यासारख्या अनेक दिग्ग्जांची कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आहे. तर दिग्गजांच्या निवृत्तीमुळे तसेच अनेक कारणांमुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली आहे. रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.त्यानंतर आता आणखी एका युवा खेळाडूला कमी वयात नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे.
इंग्लंड संघ टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर आता दक्षिणआफ्रिके विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
अवघ्या 1 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या खेळाडूला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 21 वर्षीय जेकब बेथल याला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार केलं आहे. जेकब यासह इंग्लंडचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. वयाच्या 21 वर्ष 329 दिवशी जेकबचं कर्णधार म्हणून नाव जाहीर करण्यात आलं आहे. आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. मात्र हे सामने कुठे होणार? हे जाहीर करण्यात आलेलं नाही.
पहिला सामना, बुधवार, 17 सप्टेंबर
दुसरा सामना, शुक्रवार, 19 सप्टेंबर
तिसरा सामना, रविवार, 21 सप्टेंबर
जेकब बेथल इंग्लंडचा वनडे कॅप्टन
आयर्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जेकब बेथेल (कॅप्टन), रेहान अहमद, सन्नी बेकर, टॉम बँटन, जोस बटलर, लियाम डॉसन, टॉम हार्टले, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, फिल सॉल्ट आणि ल्यूक वुड.
ऑलराउंडर जेकब बेथेल याने इंग्लंडसाठी वर्षभरात तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं. जेकब आतापर्यंत 4 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 13 टी 20i सामने खेळला आहे.