अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं.लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऋषभ पंतला विकेटकीपिंग करताना बोटाला लागलं होतं. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात ऋषभ पंतला दुखापत झाली आणि पुढचं गणित बिघडलं. पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली होती. त्यामुळे बीसीसीआयने आता ताकही फुंकून पिण्याचा विचार केला आहे. आगामी देशांतर्गत स्पर्धेसाठी एक नियम तयार केला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मल्टी डे सामन्यासाठी एक नवा ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ सादर केलं आहे. हा नियम 2025-26 स्पर्धेपासून लागू होणार आहे. म्हणजेच एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याची रिप्लेसमेंट लगेच दिली जाणार आहे. ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीनंतर बीसीसीआयचे डोळे उघडले आहेत.
नव्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू मल्टी डे सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आणि सामन्याबाहेर जाण्याची वेळ आली, तर टीम व्यवस्थापन एक समान क्षमता असलेला खेळाडू रिप्लेस करू शकते. ही रिप्लेसमेंट तात्काळ लागू होऊ शकते. यासाठी निवड समिती आणि सामनाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. या नियमामुळे संघाच्या रणनितीवर फरक पडणार नाही. तसेच खेळाचा स्तरही कायम राहील. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या सेमिनारमध्ये पंचांना या नव्या नियमाबाबत सांगितलं आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर निर्णय घेता येईल.
नवीन नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूला खेळताना मैदानावर गंभीर दुखापत झाली, तर संघ व्यवस्थापन त्याच्या जागी रिप्लेसमेंट मागू शकते. एक फलंदाज फलंदाजाची जागा घेईल किंवा गोलंदाज गोलंदाजाची जागा घेईल. नाणेफेकीपूर्वी संघाने घोषित पर्यायी खेळाडूंमधून हा खेळाडू निवडला जाईल. पण विकेटकीपरला दुखापत झाली असेल आणि संघात दुसरा विकेटकीपर नसेल, तर सामनाधिकारी संघाला बाहेरील कीपरला बोलावण्याची परवानगी देऊ शकतात.
दुसरीकडे, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अशा बदलीला परवानगी नसेल. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेसाठी हा नियम नसेल. त्यात आयपीएल स्पर्धेत हा नियम लागू होईल की नाही ते देखील अस्पष्ट आहे. आयसीसी नियमानुसार खेळाडूचं रिप्लेसमेंट खेळाडूला कन्कशन झालं असेल तरच होते. त्यातही तो खेळाडू सात दिवस कोणताही सामना खेळू शकत नाही. कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणजे जेव्हा एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली असेल आणि तो पुढे खेळण्याची स्थिती नसेल.