Rajesh Khanna: घरातल्या मंदिरात गुपचूप उरकलं लग्न आणि…, राजेश खन्नांच्या प्रेयसीचा मोठा दावा
Tv9 Marathi August 16, 2025 10:45 PM

Rajesh Khanna Love Life: दिवंगत दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांनी एक काळ बॉलिवूड गाजवला होता… काका म्हणून देखील ते बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय होते. पण म्हणतात ना आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सारखा नसतो… असंच काही राजेश खन्ना यांच्यासोबत देखील झालं. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा देखील आला जेव्हा राजेश खन्ना यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. ज्याचा परिणाम त्यांच्या खासगी आयुष्यावर देखील झाला. सतत होत असलेल्या वादांमुळे पत्नी डिंपल यांनी देखील राजेश खन्ना यांची साथ सोडली. राजेश खन्ना कायम नशेत असायचे. दरम्यान अनिता आडवाणी यांच्यासोबत देखील राजेश खन्ना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता यांनी मोठा दावा केला आहे. राजेश खन्ना यांच्यासोबत घरातील मंदिरात गुपचूप लग्न केलं… असा दावा अनिता यांनी केला. ‘मी राजेश खन्ना यांच्यासोबत 2000 पासून राहण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचा स्वभाव अत्यंत शांत होता. पण दारू प्यायल्यानंतर त्यांचं स्वतःवर असलेलं नियंत्रण सुटायचं. तेव्हा त्यांना छोट्या – छोट्या गोष्टींचा राग यायचा…’

गुपचूप उरकलं लग्न – अनिता आडवाणी

राजेश खन्ना यांच्यासोबत असलेल्या नात्यावर अनिता म्हणाल्या, ‘आम्ही गुपचूप लग्न केलं होतं. पण इंडस्ट्रीमधील कोणीच यावर बोलत नाही. सर्व म्हणतात आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण माध्यमांमध्ये आमच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या, ज्यामुळे लग्नाबद्दल काही बोलण्याची गरज मला वाटली नाही.’

मंगळसूत्र घातलं होतं आणि सिंदूरही लावला होता – अनिता आडवाणी

अनिता म्हणाल्या, ‘आमच्या घरात एक छोटं मंदिर होतं. मी सोन्याचं मंगळसूत्र बनवलं होतं. त्यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सिंदूर देखील लावलं… त्यानंतर ते मला म्हणाले आजपासून तू माझी जबाबदारी आहेस… असंच एका रात्री आमचं लग्न झालं. ‘

अनिता असंही म्हणाल्या की, ती राजेश खन्ना यांच्या आयुष्यात डिंपल कपाडियाशी लग्न करण्यापूर्वीही होत्या. पण त्या सुपरस्टारशी लग्न करू शकल्या नाहीत. अनिता कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असतात. दोघांचे अनेक फोटो देखील समोर आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.