अभिप्राय- रसिकांना भावणारी गझल
Marathi August 17, 2025 08:25 AM

>> सुधाकर वसईकर

गझल असो वा कविता लिहिणे ही एक दीर्घ प्रािढया आहे. त्यानुसार कवीचे मनन, चिंतन निरंतर सुरूच असते. फरक इतकाच की गझल लिहिण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. आणि त्याला मंत्राची जोड मिळाली की अर्थपूर्ण गझल लिहिता येते. महत्त्वाची अट म्हणजे गझल लिहिण्यासाठी अगोदर चांगला कवी असणे गरजेचे असते. अशोक गुप्ते हे चांगले कवी असून, त्यांचे  एकूण 7 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. सभोवतालच्या परिस्थिती निरीक्षणातून, वैचारिक रवंथातून त्यांनी अनेकविध विषयांवर गझल लिहिल्यात. त्या बहरल्या, डवरल्या आणि त्यातून आकारास आलेले ‘हे झाड चेतनेचे’ पुस्तक संवेदना प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.

अशोक गुप्ते यांच्या पहिल्याच गझलसंग्रहात एकूण 81 गझल आहेत. रसिकांना एका वेळी एकाच भावस्थितीचा आस्वाद घेता यावा म्हणून, प्रेमविषयक, आध्यात्मिक, सामाजिक/राजकीय स्वरूपाच्या आणि  गैरमुसलसल गझल असे गझलांचे चार ढोबळ भाग केल्याचं अशोक गुप्ते यांनी मनोगतात नमूद केलंय.

गझलसंग्रहातील काही गझल/शेर खरोखरच वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात. कौटुंबिक असो वा घरादारात, समाजात असो वा सर्वत्र, माणसामाणसांत ताणतणाव वाढत चाललाय. मनामनात अशांततेने घर केलंय. ही बाब चिंतनीय असून, अस्वस्थ करणारी आहे. याची खंत ‘सर्व पृथ्वी युद्धभूमी’ गझलेतील पुढील शेरात व्यक्त केलीय.

सर्व पृथ्वी युद्धभूमी आज झाली, ना कुणाचा राहिलेला कोण वाली

निसर्गात होणारे सूक्ष्म बदल पर्यावरणास घातक ठरत आहेत. खरं तर हे सगळेच जाणून आहेत. मात्र त्याकडे विकासाच्या नावाखाली कानाडोळा केला जातो. कुणालाच त्याचे भान राहिले नसले तरी  सजग, संवेदशील मनाची अस्वस्थता गुप्ते यांनी अतिशय संयतपणे पुढील शेरातून मांडलीय.

जाते गळून आहे एकेक पान येथे,

ना येत माणसाला याचेच भान इथे

एकूणच विषमता, अन्याय, अत्याचार, पाऊसपाणी, शेती-भाती, नाती-गोती आणि मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे अशा विषय वैविध्य असलेल्या अर्थातच विषयानुरूप लिहिलेल्या मुसलसल गझलेतील बऱयाच द्विपदी मनाचा ठाव घेणाऱया आहेत. विशेषत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक वातावरणातील विसंगतीवर भाष्य करणाऱया गझल चांगल्या मर्मज्ञ रसिकांना नक्कीच भावतील. गझलसंग्रहातील कितीतरी शेर प्रत्ययकारी झाले आहेत. अनेक गझला हळव्या मनाला साद घालणाऱया आहेत.

सहज सोप्या मांडणीतून साकारलेली गझल येणाऱया भावी पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरेल. नवीन लिहित्या हातांना प्रेरणादायी असून, गझल लिहिण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारी आहे. या गझलसंग्रहाची जमेची बाजू म्हणजे कवी प्रा. अशोक बागवे यांची लाभलेली सुंदर, यथार्थ आशयगर्भ, पाठराखण होय.

हे झाड चेतनेचे

गझलकार : अशोक गुप्ते

प्रकाशक : शोक प्रकाशन

पृष्ठे : 95 मूल्य : आर? 150/-

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.