शिस्त, कल्पकता आणि मेहनत यशाची त्रिसूत्री
esakal August 17, 2025 09:45 AM

पिंपरी, ता. १६ ः ‘व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर शिस्त, कल्पकता आणि मेहनत ही यशाची त्रिसूत्री आहे. पार्श्वभूमी कशीही असो इच्छाशक्ती आणि शिस्त असेल तर यश मिळतेच,’ अशा शब्दांत युवा उद्योजक रविकांत वरपे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे मंत्र दिला.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (YIN) तर्फे ‘उद्योजकता’ आणि ‘डिजिटल क्रिएशन’ या विषयांवर आधारित ‘यिन टॉक’ कार्यक्रम पिंपरीतील कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ए.एस.एम.) उत्साहात पार पडला. ‘सकाळ यिन टॉक’सारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नाही तर प्रत्यक्ष प्रेरणाही मिळते. ‘यिन टॉक’मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळा उत्साह आणि जिज्ञासा दिसली.

सत्र १ ः उद्योजकतेचे मंत्र
पहिल्या सत्रात वरपे यांनी कोणताही व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी, संधी आणि यशस्वी होण्यासाठी लागणारी तयारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी विचारलेले प्रश्न आणि चर्चेतला सहभाग पाहून वाटले की, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही पिढी डिजिटल आणि उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकते. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष व प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला. ग्रामीण व शहरी अशा १५ पेक्षा जास्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
सत्र २ ः डिजिटल क्रिएशनचे वास्तव
‘अमुक तमुक पॉडकास्ट’चे सहसंस्थापक ओंकार जाधव यांनी डिजिटल कंटेंट क्रिएशनमधील संधी व वास्तव स्पष्ट केले. ‘फक्त प्रसिद्धी मिळवणे पुरेसे नाही, ती टिकविणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार कंटेंट, सर्जनशीलता आणि स्पष्ट उद्दिष्ट असेल तरच डिजिटल माध्यमातून यश मिळू शकते,’ असे त्यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियातून उत्पन्न मिळवण्याचे मार्ग, यूट्यूब व पॉडकास्टिंगच्या संधी आणि कमी साधनसामग्रीतून दर्जेदार काम कसे करता येते हे समजावून सांगितले.
एकता कांबळे यांनी सरस्वती वंदना सादर केली. प्राचार्य डॉ. विश्वास स्वामी, प्राचार्य संजय वालोदे यांचा सन्मान झाला. प्रभंजन नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘यिन’च्या महाविद्यालयीन समन्वयक प्रा. प्रतीक्षा इंगळे यांनी प्रास्ताविक केले. ‘कोअर टीम’ प्रमुख आदित्य बोरसे यांनी आभार मानले. ‘यिन’चे विभागीय अधिकारी शंतनू पोंक्षे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीणचे ‘यिन’ अधिकारी चेतन लिम्हण यांनी केले. ‘यिन’ विभागाचे आकाश पांढरे, अनुजा पाटील, प्रगती मसाळ, धारा राठौर, श्रीजीत जोशी, आदेश पोखरकर, रोहन हुलावळे, आदिती वाबळे, रेणुका खंडागळे, प्रणव भोसले (सोशल मीडिया प्रमुख) यांच्या पथकाने व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
सहभागी महाविद्यालये
ग्रामीण : इंद्रायणी विद्यामंदिर (तळेगाव), कृष्णाराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (तळेगाव), हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (राजगुरुनगर), सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय (राजगुरुनगर)
शहर : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी), औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (पुणे), प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (चिंचवड), मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी (थेरगाव), जे.एस.पी.एम. राजर्षी शाहू महाविद्यालय (ताथवडे), मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (निगडी), ए.एन.बी.पी. विधी महाविद्यालय (मोरवाडी), डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (पिंपरी), रसिकलाल माणिकचंद धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (चिंचवड), पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च ॲड मॅनेजमेंट (आकुर्डी), गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल (मोशी).
---
आजच्या पिढीमधील उत्साह आणि शिकण्याची तयारी मी इथे पाहिली. ती खरोखरच कौतुकास्पद आहे. ‘यिन टॉक’ सारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक मार्गदर्शन मिळतेच,

तसेच स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नवे प्रयोग करण्याची हिंमतही त्यांच्यात निर्माण होते. यापैकी अनेक विद्यार्थी उद्योजकतेचा प्रवास सुरवात करतील, अशी खात्री वाटते.
- रविकांत वरपे, उद्योजक
---
आजच्या पिढीमध्ये जो उत्साह आणि शिकण्याची तयारी मी इथे पाहिली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक मार्गदर्शन देत नाहीत, तर त्यांना स्वतःवर विश्वास ठेवून नवे प्रयोग करण्याची हिंमतही देतात. मला खात्री आहे की इथून पुढे या विद्यार्थ्यांपैकी बरेच जण उद्योजकतेच्या प्रवासाला सुरवात करतील.
- ओंकार जाधव, सहसंस्थापक, अमुक तमुक पॉडकास्ट
---
आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीवर विसंबून राहू नये. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडतो आणि ते भविष्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होतात.
- ललित कनोरे, प्राचार्य, ए.एस.एम. (सी.एस.आय.टी) कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पिंपरी
-----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.