बीज अंकुरले... रोप वाढले!
esakal August 17, 2025 11:45 AM

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) ः पर्यावरण रक्षणासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने हरित क्षेत्र संवर्धन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने ‘घर घर नर्सरी’द्वारे नागरिकांना दहा हजार बियाण्यांचे वाटप केले होते. या बियाण्यांचे आता रोपात रूपांतर झाले आहे. या रोपांची महापालिकेकडून रीतसर लागवड केली जाणार आहे.

मिरा-भाईंदर पालिकेकडून यावर्षी ५० हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरणदिनाचे औचित्य साधून महापालिकेने जूनमध्ये उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून घर घर नर्सरी योजनेद्वारे प्रशासनाने भारतीय प्रजातीच्या झाडांच्या दहा हजार बियाण्यांचे वाटप केले. यासाठी महापालिकेची उद्याने, शाळा यांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या विविध उद्यानात सकाळी व सायंकाळी अनेक लोक येतात. मिरा-भाईंदर शहरात सुमारे ५९ उद्याने आहेत. त्यात सर्वात जास्त लोक येत असलेल्या उद्यानांमध्ये महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांकडून बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शिवाय महापालिकेच्या ३६ शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला.

मुलांमध्ये वृक्षलागवडीची जागरुकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना बियाणे देण्यात आली. बियाण्यांचे वाटप केल्यानंतर उद्यान अधीक्षकांकडून बियाण्यांची लागवड कशी करायची, त्याची काळजी कशी घ्याची, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या उपक्रमात एक हजार ५४४ नागरिकांना, तसेच आठ हजार ४५६ विद्यार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यातील बहुतांश बियाण्यांना अंकुर फुटून त्याचे रोपात रूपांतर झाले आहे. बियाण्यांचे वाटप झालेले नागरिक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आपल्या वाढलेल्या रोपांची छायाचित्रे काढून ती महापालिका अधिकाऱ्यांना पाठवत आहेत.

या वाढलेल्या रोपांची नागरिकांनी त्यांच्याकडे मोकळ्या जागा उपलब्ध असतील, तर त्यात लागवड करावी किंवा जागा नसेल ती रोपे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे आणून द्यावीत. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांची योग्य जागी लागवड केली जाईल, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरणाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी केले आहे.

दीड हजार बीजगोळे
महापालिका दीड हजार बीजगोळे (सीडबॉल्स) तयार करत आहे. हे बीजगोळे मोकळ्या जागा, ओसाड डोंगर आदी ठिकाणी टाकले जाणार आहेत, जेणेकरून त्याठिकाणी ती बियाणे आपोआप रुजणार आहेत.

उद्यान अधीक्षकांवर जबाबदारी
येत्या काही दिवसांत आणखी २५ हजार झाडांची लागवड या पद्धतीने होणार आहे व दुसऱ्या टप्प्यात १८ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यातील तीन हजार झाडांची लागवड करण्याची जबाबदारी उद्यान अधीक्षकांवर देण्यात आली आहे, असे उपायुक्तांनी सांगितले.


नागरिकांनी भारतीय प्रजातीच्या बियाण्यांचे जतन करून त्याचे रोपात रूपांतर करावे, त्यानंतर आपल्या सोसायटीच्या आवारात, आजूबाजूच्या परिसरात त्याची लागवड करावी व महापालिकेच्या घर घर नर्सरी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.