जिल्ह्यात ७१ नवीन आधार संचाचे वाटप
अलिबाग (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त नवीन आधार संचाचे वाटप नियोजन भवन येथे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १५) करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके उपस्थित होते. जिल्ह्यात ७१ संचचे वाटप या वेळी करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाल्या, आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा वेळेत आणि सुरळीत मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या किट्समुळे महानगरी भागांपासून अगदी दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक नागरिकाला आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहज मिळणार आहेत. या सर्व आधार संस्थाचालकांनी नियमांचे पालन करून सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आधार प्रामाणिकरण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांनी केले.