Ellora Cave : वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा, वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलले
Saam TV August 17, 2025 09:45 AM
  • सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविक-पर्यटकांची तुफान गर्दी.

  • वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा व पार्किंग सुविधांचा अभाव.

  • स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यापार तेजीत, अर्थव्यवस्थेला चालना.

छत्रपती संभाजी नगर येथे असलेली जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला (गोकुळाष्टमी) आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वेरूळ परिसर पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर लेणी परिसरात हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. एवढी मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या दोन ते अडीच किलोमीटर लांब रांगा लागल्या. योग्य पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक पर्यटकांना आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावावी लागली. त्यानंतर लेणी दर्शनासह घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले. तरीही गर्दी असूनही भक्त आणि पर्यटकांच्या चेहऱ्यावर समाधानाचीच झलक दिसत होती.

Ajintha Verul Film Festival: पद्मभूषण 'सई परांजपे' यांना 'पद्मपाणी जीवनगौरव' पुरस्काराने केलं सन्मानित, पाहा PHOTOS

या गर्दीचा सर्वाधिक फायदा वेरूळ परिसरातील व्यापाऱ्यांना झाला. येथे राहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी लॉजिंग-हॉटेलमध्ये मुक्काम केला, भोजनालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जेवणाची मागणी वाढली. मंदिर आणि लेणी परिसरात असलेल्या छोट्या-मोठ्या दुकानदारांनीही खरेदी-विक्री करून चांगली कमाई केली. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये त्यामुळे मोठा उत्साहाचे वातावरण आहे.

Verul-Ajanta Festival: पुन्हा सुरू होणार वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव, नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

वेरूळ लेणी ही जागतिक वारसा स्थळे असल्यामुळे परदेशी पर्यटक देखील येथे वर्षभर भेट देतात. परंतु या सलग सुट्ट्यांमुळे देशांतर्गत पर्यटकांची एवढी मोठी गर्दी झाली आणि अनेकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळण्यात अडचणी आल्या. पार्किंग, शौचालय, पिण्याचे पाणी यांसारख्या सोयी-सुविधा कमी पडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पर्यटकांनी सुविधांची कमतरता व्यक्त केली असली तरी लेणींच्या अप्रतिम शिल्पकलेचे सौंदर्य आणि घृष्णेश्वर महादेवाचे आध्यात्मिक दर्शन या दोन्हीमुळे त्यांचा प्रवास अविस्मरणीय ठरल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

Ellora Caves: वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव सोहळा; हजारो पर्यटक वेरुळमध्ये दाखल

दरम्यान, स्थानिक प्रशासनानेही गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला होता. वाहतूक पोलिसांनी सतत गाड्यांचा रस्ता मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र रांगा इतक्या लांब असल्यामुळे पर्यटकांना थोडा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची सोय करून भाविकांची सेवा केली.

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरूवात, जगभरातील ५५ चित्रपटांची मेजवाणी

एकूणच, या सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसर ‘हाउसफुल’ झाला असून, धार्मिक आणि पर्यटनाच्या संगमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो पर्यटकांच्या भेटीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असली तरी आगामी काळात अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक सुविधा वाढवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.