Jasprit Bumrah : भारताला बुमराहला सांभाळण्याची गरज नाही, संजय मांजरेकर यांचा हल्लाबोल
GH News August 17, 2025 01:13 AM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग अर्थात जसप्रीत बुमराह याच्यावर गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने वर्कलोड मॅनेजमेंटच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला जात आहे. भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. मात्र जसप्रीत बुमराह या मालिकेतील फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. बुमराहने इंग्लंड दौऱ्याआधीच तो फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच बुमराहला त्याआधी दुखापतीमुळे अनेक महत्त्वाच्या सामन्यांना मुकावं लागलं होतं. आता टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याआधी भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर याने जसप्रीत बुमराह याच्यावर टीका केली आहे. तसेच संजय मांजरेकर याने बीसीसीआयला उद्देशूनही काही म्हटलं.

मांजरेकर जसप्रीत बुमराहवर नाराज

मांजरेकरने जसप्रीत बुमराहवर एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून नाराजी व्यक्त केली. “खेळ नेहमीच आरसा दाखवतो. टीम इंडिया जसप्रीत बुमराह याच्याशिवाय इंग्लंड विरुद्ध 2 सामने खेळली. बुमराह ज्या 2 सामन्यांमध्ये खेळला नाही त्याच सामन्यांत भारताने विजय मिळवला, हे थक्क करणारं आहे. आता निवड समितीलाही मोठ्या खेळाडूंना संधी देण्याआधी काही पर्यायांचा विचार करावा लागेल. ही मालिका त्याच्यासाठी आणि आपल्यासाठीही एक धडा राहिला आहे. भारताने ज्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला त्यात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शमी नव्हते. बुमराहनेही अशाप्रकारेच भारताला सांभाळायला हवं”, असं मांजरेकर यांनी म्हटलं.

“बुमराह सलग 2 सामने खेळू शकत नसेल किंवा कधी कधी तो एकापेक्षा अधिक सामन्यात सहभागी होऊ शकत नसेल तर तो तुमचा प्रमुख गोलंदाज नसायला हवा. जो फिट असेल आणि खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असेल अशाच खेळाडूची तुम्ही निवड करायला हवी. कसोटी क्रिकेटमध्ये फिट खेळाडूंची फार गरज असते. भारताला बुमराहला सांभाळण्याची  गरज नाही. हे काम स्वत: गोलंदाजाला (बुमराहला) करावं लागेल. बुमराहला काही अवघड निर्णय घ्यावे लागतील. तसेच फिटनेसमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. असं याआधीही अनेक वेगवान गोलंदाजांनी केलं आहे”, असं मांजरेकरांनी बुमराहबाबत या लेखात म्हटलं आहे.

जसप्रीत बुमराहची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळला. बुमराहने एकूण 3 सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या. भारताला पहिल्या (लीड्स) आणि तिसऱ्या सामन्यात (लॉर्ड्स) पराभूत व्हावं लागलं. तर चौथा सामना हा बरोबरीत राहिला होता. तर भारतीय संघ दुसर्‍या आणि पाचव्या कसोटीत बुमराहशिवाय खेळली. भारताने हे दोन्ही सामने जिंकले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.