निरंजन आगाशे - editor@esakal.com
भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या दहा-पंधरा वर्षांत जन्मलेल्या पिढीपुढचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या धुमाळीत तयार झालेला ध्येयवादाचा पीळ लोपू न देता तो ‘सुराज्या’च्या कामी उपयोगात आणणे. ‘सुराज्य’ याचा अर्थ केवळ सरकार आणि प्रशासन नव्हे. या ‘सुराज्या’ला इतर कितीतरी पैलू होते. वक्तृत्व, चित्रकला, संगीत, चित्रपट, नाटक, लेखन, संघटन, समाजकारण, शिक्षण ही सगळीच क्षेत्रे जणू ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर...’ असे खुणावत होती. त्याला ज्या लोकांनी आपापल्या परीने प्रतिसाद दिला, आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली त्यांना आपल्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना काय वाटते, याचा मागोवा ‘नव्या युगाचे पाईक’ या पुस्तकात शब्दांकित झाला आहे.
विनय हर्डीकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त जे विविध उपक्रम झाले, त्यातीलच हा एक ग्रंथप्रकल्प. १९४७ ते १९६२ या दरम्यान जन्मलेल्या मित्रमंडळींना, एकेकाळच्या सहकाऱ्यांना लिहिते करून एक ‘मैफल’ राजीव बसर्गेकर व हर्डीकरांनी जमवून आणली आहे. त्यात ‘विविध गुणदर्शन’ असले, तरी त्या सगळ्यांना बांधणारे ध्येयवादाचे सूत्र कधी प्रकटपणे तर कधी सूचक रीतीने व्यक्त झाले आहे.
सर्वांनीच स्वतःच्या कारकिर्दीचा आढावा घेताना आत्मगौरवात रममाण न होता काहीसे अंतर्मुख होऊन केलेले हे लेखन आहे. या लेखनातील सूत्र शोधायचे झाले, तर यातील बहुतेक सर्व जण सौंदर्याचे उपासक आहेत, हे जाणवते. त्यामुळे समाजरचनेतील, व्यवस्थेतील दोष त्यांना खुपतात. ती सुधारावी, याची तळमळ त्यांच्या अभिव्यक्तीतून प्रकट झाली आहे. ‘प्राज’च्या उद्योजकीय वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकताना डॉ. प्रमोद चौधरींच्या मनातील स्वदेशी आणि स्वविकसित तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारण्याची जिद्द दिसते.
अविनाश देशमुख रासायनिक क्षेत्रातील लघुउद्योगांविषयी लिहिताना देशातील लघुउद्योगांच्या भविष्याचे चित्र रेखाटतात. डॉ. वसंत काळपांडे यांच्या लेखातून सरकारी अधिकारी शिक्षणाच्या माध्यमातून किती गोष्टी साध्य करू शकतात, याचे अनुभवाधारित कथन वाचायला मिळते. डॉ. गिरीश बापट, अनंत अभंग, डॉ. राजन हर्षे, पराग शहा यांची शिक्षण क्षेत्रातील वाटचाल वाचताना त्यातील व्यापक राष्ट्रीय जाणीव लक्ष वेधून घेते. दिग्विजय वैद्य आणि अमरेंद्र धनेश्वर यांची सांगीतिक वाटचाल आपल्याला अभिजात संगीताच्या दुनियेची अल्पशी सैर घडवून आणते; पण हे दोन्ही कलाकार केवळ कलानंदात रममाण नाहीत, तर सामाजिक-राजकीय घडामोडींंत त्यांचा डोळस सहभाग आहे.
स्वयंसेवी चळवळी हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य. चेतन गाला यांचे स्त्री सक्षमीकरणाचे, तर बाळासाहेब कोळेकर यांचे ग्रामीण विकासाचे काम यांचा परिचय त्यांच्या लेखांमधून होतो. प्रदीप आपटे यांनी शरद जोशींच्या विचारांची मार्मिक चिकित्सा केली आहे. अर्थशास्त्रीय विषय मराठीतही किती समर्थपणे मांडता येतो, याचा वस्तूपाठ म्हणजे हा लेख. सरोज काशीकर, अमर हबीब यांचेही अनुभव वाचनीय आहेत. सोपान कांचन, भूषणा करमरकर यांच्या निवेदनांत कृषी बाजारव्यवस्थेविषयी बरीच नवी माहिती मिळते.
याशिवाय सतीश आळेकरांचा नाट्यप्रवास, मुखपृष्ठांच्या निर्मितीचे रविमुकूल यांचे अनुभव, अनिल झणकर यांची चित्रपटक्षेत्रातील वाटचाल, भानू काळे यांची साहित्य-संपादनातील कामगिरी, अनिल मोरे यांची ‘गिर्यारोहणा’तील ‘भटकंती’ असा एक बहुरंगी कोलाज या पुस्तकातून साकार झाला आहे. गणेश देवी, ले. जन. सुदर्शन हसबनीस, डॉ. नंदू करजगीकर, विनय टेंबे, राजीव बसर्गेकर, प्रो. अनिरुद्ध पंडित, अरविंद करंदीकर, डॉ. संजय मेहेंदळे, अभय बंग, श्याम अष्टेकर, मोहन गुजराथी, सत्यशील देशपांडे यांचेही लेख पुस्तकाच्या मौलिकतेत भर घालणारे आहेत.
लेखकनिवडीचा पल्ला मोठा असला तरी महाराष्ट्रातील चळवळी, विचारसरणी आणि संघटना यांचा व्याप पाहता काही भाग, काही विषय अनुल्लेखित राहणे स्वाभाविक होते. ‘नकाशाविना प्रवास केला’ या शीर्षकाचा हर्डीकरांचा लेख पुस्तकाच्या अखेरीस आहे. तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांतील पूल किती महत्त्वाचा असतो, याचे विवेचन त्यांनी केले आहे. हा ग्रंथही तशाच प्रयत्नांचा एक भाग आहे असे म्हणता येईल.
पुस्तकाचे नाव : नव्या युगाचे पाईक
संयोजन, संपादन : राजीव बसर्गेकर
प्रकाशक : देशमुख आणि कंपनी
पृष्ठे :४५२ मूल्य : ६०० रु.