भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही संपूर्ण देशात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर पाकिस्तानात पुरामुळे 327 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 26 जूनपासून पाकिस्तानात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 650 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पाकिस्तानवरील संकट टळलेलं नाही. हवामान खात्याने 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच देशाच्या वायव्य भागातही पावसाचा कहर पहायला मिळण्याची शक्यता आहे. देशात यंदा सामान्य पेक्षा लवकर पाऊस सुरु झाला आहे. तसेच हा पाऊस आता पुढील दोन आठवड्यांपर्यंत सुरु राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 327 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बुनेरमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पावसामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात 137 लोक जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकांसह गुरे आणि वाहने वाहून गेली आहेत.
देशातील दुर्गम गावांमध्ये भूस्खलन झाले आहे, अनेक लोक या ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. त्यामुळे अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या 2 हजार कर्मचारी बचाव कार्य करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बऱ्याच ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.
खैबर पख्तूनख्वा बचाव संस्थेचे अधिकारी बिलाल अहमद फैजी यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. रुग्णवाहिकांना बाधित भागात पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. पाकिस्तान आर्मीच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स अर्बन सर्च अँड रेस्क्यू (USAR) टीम बुनेर, शांगला आणि स्वातमध्ये बचाव कार्य करत आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.