खांदाट पाली उपसरपंचपदी वाईल
चिपळूण : ग्रुप ग्रामपंचायत खांदाट पालीच्या उपसरपंचपदी सचिन वाईल यांची बिनविरोध निवड झाली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच तन्वी खेडेकर, ग्रामसेवक महादेव सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर महाडिक, एकनाथ महाडिक, सृती सुनील घाडगे, संस्कृती संजय खेडेकर, शारदा राम घोले आदी उपस्थित होते. उपसरपंचपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल वाईल यांनी सर्वांचे आभार मानले. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून गावचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते राजनंदिनीचा सत्कार
चिपळूण ः पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत खेड भडगाव येथील ज्ञानदिप विद्यामंदिरच्या राजनंदिनी संदीप सावंत हिने राज्यात सातवा तर राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राजनंदिनीचा गौरव करण्यात आला. राजनंदिनी सावंत ही पहिलीपासूनच ज्ञानदिप विद्यामंदिर येथे शिक्षण घेत आहेत. तिला लहानपणापासून वाचनाची आवड, नेहमीच अवांतर वाचनावर तिने भर दिला आहे. शालेय स्तरावरील सर्व स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होऊन तिने बाजी मारली आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामुळे तिन यावर्षी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत सातवा आणि राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची स्टार विद्यार्थी म्हणून निवड होत आहे. विविध वकृत्व स्पर्धेतही तिने यशाची मोहोर उमटवली आहे.
जांभरुणला विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजवंदन
रत्नागिरी ः तालुक्यातील जांभरुण येथील ग्रामपंचायतीमधील ध्वजवंदन गावातीलच गुणवान विद्यार्थी कुणाल दत्ताराम सावंत याच्या हस्ते करण्यात आले. सरपंच गौतम सावंत यांनी यंदा १५ ऑगस्टला होणाऱ्या या ध्वजवंदनाचा मान स्वतः न घेता कुणालला दिला. यावेळी कुणाल सावंतसह आर्यन धोपट, आर्य शिंदे, समिता धोपट या विद्यार्थ्यांचा उपसरपंच मंदार थेराडे यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सर्व शाळातील शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
डान्स अकॅडमीची पावस येथे शाखा
पावस ः रत्नागिरी आणि लांजा येथील नृत्याविष्कार डान्स अकॅडमीच्या यशानंतर पावस येथे महाकाली पॅलेस येथे ४ थी शाखा सुरू केली आहे. यावेळी उपस्थित नृत्याविष्काराच्या संचालिका कथ्थक नृत्य विशारद श्रीमती आसावरी आखाडे-राऊत, गणेश राऊत, प्रेरणा खेडस्कर, रोहन शेलार, अविनाश डोर्लेकर, दिलीप बोलये, पालक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. अकॅडमीमध्ये शास्त्रीय नृत्य प्रकार, कथ्थक यासह इतर नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.