झोयाच्या आठवणीत रमणारी नूरी!
esakal August 17, 2025 02:45 PM

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

नूरीला त्या रात्री स्वप्नात झोया दिसली. झोया- नूरीची लाडकी बहीण. तिला त्रास देणारी, खोड्या काढणारी, धिंगाणा घालणारी, गुपितं सांगणारी अशी तिची गोडांबी, तिची खूप खूप आवडती बहीण! ज्या रात्री नूरीला झोयाचं स्वप्न पडलं ना, त्या रात्री झोया इस्पितळात होती.

दुसऱ्या दिवशी नूरीच्या आईने सांगितलं की, झोया आपल्यातून कायमची निघून गेलीय. नूरी खूप रडली, ओक्साबोक्शी रडली.

‘‘बाळा, झोया आपल्याबरोबर नेहमी असेल.’’ आईने नूरीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण नूरीला माहीत होतं की, आई खोटं बोलतेय. एकदा गेलेली झोया परत कधीच येणार नाही. मग कशी असेल ती आमच्यासोबत नेहमीसाठी? त्या दुपारी पाऊस पडला. एक मिनिट! हे कोण दिसतंय? झोया? नाही नाही! नूरीला भास झाला.

नूरीला वाटलं, मला कायमचं सोडून गेलेली बहीण माझ्या आवडत्या छत्रीभोवती चिखलाचा राडा आता थोडीच करू शकणार होती! माझ्या ताटात वाढलेल्या इडल्या कशा पळवणार होती? कुठूनही प्रकट होऊन मला मागून ‘भॉक’ करणं तर आता होणारच नव्हतं आणि शाळेतली ती गुप्त जागा जिला आम्हा दोघींची सगळी गुपितं माहीत होती तिथेही ती कधीच दिसणार नाही! सगळं कसं एकदम बदलून गेलंय. शांत शांत झालंय. आई म्हणते तशी कुठंय झोया आजूबाजूला? का आई असं खोटं बोलतेय? झोया गेल्यानंतर आता नूरीला रोज रात्री एक भीती सतावू लागली होती. आई आणि ब्रुनोही तिला सोडून गेले तर? तिने मग ब्रुनोकडून वचनच घेतलं. ‘‘ब्रुनो, मला सोडून कध्धी कध्धी जायचं नाही बरं का!’’ ब्रुनोनेही शेपटी हलवत नूरीला तसं वचन दिलं.

काही आठवडे उलटले. एक दिवस धारा घरी आली. ही धारा म्हणजे झोयाची घट्ट मैत्रीण, पण नूरीने तिला गृहपाठाचं कारण सांगून घालवून दिलं. कारण धाराने झोयाच्या कुठल्याही वस्तूंना हात लावलेलं नूरीला चालणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी धारा आली, तेव्हा तर नूरीने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू घरी येत जाऊ नकोस. तू झोयाची जागा कधीच घेऊन शकणार नाहीस, कळलं?’’ धारा काय करावं हे न कळून तशीच उभी राहिली, तेव्हा नूरीच्या आईने तिला मिठीत घेतलं. मग मात्र नूरीचा राग अनावर झाला. धाराने झोयाच्या वाढदिवसाला जे पुस्तक भेट दिलं होतं, ते तिने फाडून टाकलं! नूरी चिडचिडी झाली होती.

तिला कोणत्याच गोष्टीत आनंद मिळत नव्हता. तिचा सगळा उत्साह, आनंद, ऊर्जा झोयासोबतच निघून गेलं होतं. एक भकासपण तिच्या अवतीभवती भरून राहिलं होतं. ती तर आईवरसुद्धा रागावून तावातावाने तिला म्हणाली, ‘‘तू वेडी आहेस, त्या शिवाय खोटारडीही आहेस.

मेलेली माणसं आपल्याबरोबर नाही असू शकत.’’ आई तिला फक्त एवढचं सांगायचा प्रयत्न करत होती की, झोया आपल्या आजूबाजूला असते, मनात असते, तिचं असणं समजून घ्यायला हवं! पण छे! नूरीला ते पटत नव्हतंच. तिला झोयाचं नसणं अगदी तीव्रतेने जाणवत होतं. ‘‘नूरी! नूरी! नूरी!’’ ‘झोयाचा आवाज? झोया मला हाक मारतेय?’ नूरी त्या आवाजाच्या दिशेने गेली. बघते तर काय बाहेर दिवाणखान्यात तिला झोया दिसली. नूरी आणि झोया खूप हसल्या, खेळल्या, लोळल्या, पडल्या, धडपडल्या, ब्रुनोही उड्या मारू लागला आणि धाराने तिचा तो नेहमीचा विदुषकी चेहरा केला आणि झोयालासुद्धा नेहमीसारखंच हसू फुटलं! तो व्हिडिओ संपला तेव्हा उजाडलं होतं! नूरीची ही भावस्पर्शी गोष्ट लिहिलीय ऋचा झा यांनी.

गोल चष्मा घातलेली, गोल चेहऱ्याची गोड झोया, दोन वेण्यांची तिची जिवलग मैत्रीण धारा आणि नूरी - यांची सुंदर, जिवंत चित्र काढली आहेत गौतम बेनेगल यांनी. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला असून, ते एकलव्य फाउंडेशनने प्रकाशित केलं आहे. तो जुना व्हिडिओ पाहून संपल्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाला सुरुवात झाली! आणि हे काय? इंद्रधनुष्य? अहाहा! नूरी बाहेर पळाली.

‘भॉक’ झोयाचा आवाज आला. नूरीला वाटलं आता नेहमीसारखी झोया क्षणार्धात नाहीशी होईल, पण ती होती तिथेच! नूरीच्या बोटांना तिच्या मऊ बोटांचा स्पर्श पण झाला! तिला सोडून नूरीला शाळेत जायचं नव्हतं, पण तिथेही असेलच झोया असं आई म्हणाल्यामुळे ती आवरून शाळेत निघाली. आज किती तरी दिवसांनी ती उत्साही दिसत होती. त्या भरात जणू काही पन्नास हजार इडल्या खाल्ल्या तिने आणि शिवाय काही डब्यात भरूनसुद्धा घेतल्या. झोया होतीच तिथे खुर्चीवर बसलेली.

झोयासोबतच नूरी मग शाळेत पोहोचली. तिने शाळेत पाहिलं, तर धारा एकटीच बसून होती. नूरीला तिला कसं सामोरं जावं कळत नव्हतं. ती धाराला टाळून पुढे निघणार एवढ्यात झोयाने तिला मागून ढकललं. ‘‘धारा मला माफ कर!’’ नूरीने हिम्मत गोळा करून म्हटलं. मग दोघी झोयाच्या आठवणीत एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. पण त्यादिवशी शाळेतून आल्यावर मात्र नूरी, धारा, ब्रुनो आणि हो - झोयासुद्धा- सगळ्यांनी मिळून नुसता धांगडधिंगा घातला! तेव्हा नूरीला कळलं, पुन्हा कधीच परतून न येऊ शकणारं माणूस आसपासच असतं म्हणजे नेमकं काय ते!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.