सिंदेवाही : शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी फुटबॉल खेळून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा येथील बोकडडोह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार (ता. १६) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
जीत टीकाराम वाकडे (वय १५) आणि आयुष दीपक गोपाले (वय १६) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृत बालके सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी होते. या घटनेने वाकडे, गोपाले कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१६ ऑगस्ट रोजी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे जीत आणि आयुष हे दोघे काही मित्रांसह सकाळी सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल खेळायला गेले होते. खेळ संपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी परतले. मात्र, १० ते १२ मित्रांनी पोहण्याचा बेत केला. कुटुंबीयांना खेळायला जात असल्याचे सांगून ते टेकरी येथील बोकडडोह नदीवर गेले.
नदीत उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यात जीत आणि आयुषचा बुडून मृत्यू झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवाभाऊ मंडलवार हे दुचाकीने काही कामासाठी सिंदेवाहीकडे जात होते. तेव्हा त्यांना नदीच्या पुलावर काही मुले थांबलेली दिसली. चौकशी केल्यावर त्या मुलांनी त्यांचे दोन मित्र पाण्यात उतरले, पण ते बाहेर आलेच नाही, असे सांगितले. यानंतर मंडलवार यांनी ही माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. टेकरी येथील नागरिकांच्या मदतीने नदीत शोध मोहीम सुरू केली. काही वेळातच पोलिसांना दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यात आढळले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
Siddheshwar Dam: मुसळधार पावसामुळे येलदरी भरले; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून ६५०० क्युसेस विसर्गपोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १२ विद्यार्थी पोहण्यासाठी नदीवर गेले होते. पण त्यातील जीत आणि आयुष यांना नदीच्या पाण्याची खोली लक्षात आली नाही आणि त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.