टोकावडे, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील वेळूक ग्रामपंचायत अंतर्गत चार प्रवेशद्वारांच्या कमानींचे लोकार्पण गावाचे माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सभापती दत्तू वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कमानींना विशेष नामकरण करून गावाच्या इतिहास व परंपरेला अधोरेखित करण्यात आले आहे.
आळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर’, वेळूक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीला ‘माता रमाईनगर’, गावातील अंतर्गत रस्त्यावरील कमानीला ‘शिवशंभो प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले. वेळूक आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीला ‘हुतात्मा नाग्या महादू कातकरी प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले आहे. नाग्या महादू कातकरी हे २५ सप्टेंबर १९३० मध्ये चिरनेर जंगल सत्याग्रहात इंग्रजांच्या गोळीबारात हुतात्मा झाले होते. त्यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून केलेल्या या नामकरणामुळे आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ॲक्रेलिक नामपट्ट्या व लोखंडी धातूंच्या या कमानींमुळे गावाचे सुशोभीकरण अधिक खुलले आहे.
या उपक्रमामागे वेळूक ग्रामपंचायत उपसरपंच व शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वारघडे यांचे मोलाचे प्रयत्न आहेत. उद्घाटनप्रसंगी उपसरपंच गणेश वारघडे, माजी उपसरपंच संतोष वारघडे, रामबाबा वारघडे, संदीप वारघडे, जनार्दन वारघडे सर, प्रकाश वारघडे, मुस्ताक शेख, हरेश वारघडे, कुमार थोरात, मोहन चौधरी, एकनाथ भोईर, नंदू भोईर, शरद भोईर, विवेक वारघडे, अक्षय भोईर, किरण वारघडे, अशोक वारघडे, आळवे गावचे पोलिस पाटील किरण सोनवणे, हरिचंद्र वारघडे, भगवान मोरे, भास्कर हरड, अतुल चौधरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.