काटेवाडी, ता. १८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पाडेगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ४०.९१ कोटी रुपये निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नवीन प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवासस्थान आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्र तसेच अतिथिगृहाच्या बांधकामांचा समावेश आहे. हा निर्णय ऊस संशोधन केंद्राला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राची प्रशासकीय इमारत ९३ वर्षे जुनी आहे. यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने १४.९३ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तसेच कर्मचारी निवासस्थानासाठी ११.१२ कोटी मंजूर झाले आहेत. केंद्रावर दरवर्षी अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी भेट देतात. मात्र, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृहाची सुविधा नाही. शासनाने शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृहाच्या बांधकामासाठी १४.८६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल आणि अधिकाऱ्यांची राहण्याची सोय होईल.
ऊस संशोधन केंद्राचे महत्त्व...
पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने गेल्या अनेक दशकांपासून ऊस शेतीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. केंद्राने आतापर्यंत उसाच्या १७ सुधारित जाती प्रसारित केल्या असून, जास्त उत्पादन आणि साखरेचा उतारा देणाऱ्या जातींची निर्मिती केली आहे. आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ऊस लागवड तंत्रज्ञान आणि खोडवा पिकाच्या व्यवस्थापनासाठी शिफारशी दिल्या आहेत. शेतकरी मेळावे, चर्चासत्रे आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हे केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
प्रशासकीय इमारत: १४.९२५६ कोटी
कर्मचारी निवासस्थान: ११.१२२८ कोटी
शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि अतिथीगृह: १४.८६२७ कोटी