जुने नाशिक: भद्रकालीचा श्रीमंत राजाचे ढोल ताशाच्या गजरात रविवारी (ता. १७) आगमन झाले. रविवार कारंजा येथील देवधर लेन येथे मुखदर्शन होऊन महाआरती करत राजाच्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. किन्नर आखाड्याचे श्री श्री १००८ स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी, आईसाहेब आणि त्यांच्या अनुयायी यांना आरतीचा मान देण्यात आला होता.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने रविवारी मेनरोड फ्रुट मार्केट येथील युवक उन्नती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भद्रकालीचा श्रीमंत राजा आगमन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ढोल ताशांच्या गजरात रविवार कारंजा येथील देवधर लेन येथून आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. रविवार कारंजा, बोहरपट्टी कॉर्नर, मेन रोड, धुमाळ पॉईंट, गाडगे महाराज चौकपर्यंत मिरवणूक काढत फ्रूट मार्केट येथे समारोप करण्यात आला. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
हळद, कुंकवाचा सडा, आकर्षक रांगोळी आणि बाप्पाचा जयकारात संपूर्ण मिरवणूक भक्तिमय वातावरणात झाली. तत्पूर्वी बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली. किन्नर आखाड्याचे श्री श्री १००८ स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी, आईसाहेब आणि त्यांच्या अनुयायी यांना आरतीचा मान देण्यात आला.
त्यांच्या हस्ते आरती संपन्न होताच मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. किन्नर आकड्याच्या अनुयायींनीच देखील फुगडी खेळत आणि भगवे ध्वज नाचवत भक्तीमय भावना व्यक्त केल्या. या वेळी अंकुश पवार, व्यंकटेश मोरे, सौरभ जाधव, सारंग जाधव, विजय ठाकरे, हर्षल शेलूकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते.
Shravan Special: 'दृष्टांत झाला आणि सापडली विश्वेश्वराची शिवपिंड'; गावडेआंबेरेत चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर; पेशवाई, इंग्रज राजवटीत सनदवाहतूक मार्गात बदल
भद्रकालीचा श्रीमंत राजा आगमन सोहळा मिरवणूक मोठ्या जोमात संपन्न झाली. मिरवणूक पूर्वी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अशोकस्तंभ येथून वाहतूक बंद करण्यात आली. रामवाडी पूल मार्गे वाहतूक वळविण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे निर्विघ्न आणि उत्साहात मिरवणूक संपन्न झाली.