rat18p34.jpg -
85286
सुरज धावडे
rat18p35.jpg-
85287
सूरज धावडे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची रांगोळी.
---------
सूरज धावडेंच्या रांगोळीची जागतिक स्तरावर दखल
लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये राज्याभिषेक रांगोळीची नोंद
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १८ ः तालुक्यातील वांझोळे येथील कलाशिक्षक सूरज दत्ताराम धावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या रांगोळीची नोंद जगातील सर्वात मोठी रांगोळी म्हणून झाली आहे. याची घोषणा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे केली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रोहा, रायगड येथे ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्याची १ लाख २५ हजार चौरस मीटर आकाराची रांगोळी साकारण्यासाठी १०० कलाकार एकवटले होते. त्यासाठी ५ हजार किलो रांगोळी वापरत ७० तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली. कलाशिक्षक सूरज धावडे यांचे मूळ गाव वांझोळे आहे. माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक दत्ताराम धावडे यांचा तो मुलगा आहे. सूरज यांचे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय, आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण झाले. २०१४ मध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयातून शासकीय ड्रॉईंग डिप्लोमा इन ड्रॉईंग अँड पेंटिंग (जी. डी. आर्ट) हा अभ्यासक्रम सूरज यांनी पूर्ण केला. त्यानंतर कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून ६ वर्षे काम केले. सध्या पुणे येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये गेली २ वर्षे कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
सूरजच्या यशाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, डॉ. सदानंद आग्रे, परिसरातील मित्रमंडळी आणि वांझोळे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे. सूरज धावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या जागतिक विश्वविक्रमाबद्दल देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. धनंजय दळवी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
चौकट
कला प्रदर्शनात यश
सूरज यांच्या चित्रांची महाराष्ट्र कला प्रदर्शनात सलग दोन वर्षे विद्यार्थी गटातून निवड झाली होती. कॅमल आर्ट फाउंडेशनच्या कला प्रदर्शनासाठी २ वेळा निवड झाली होती. त्यामध्ये ते एकदा विद्यार्थी गटातून, तर दुसऱ्या वेळी व्यावसायिक गटातून सहभागी झाले होते. व्ही. व्ही. ओक राष्ट्रीय कला प्रदर्शन, पुणेकरिता सलग २ वर्षे निवड झाली होती. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय कलाप्रदर्शनातील व्यावसायिक गटातून २ वेळा निवड झाली होती तसेच दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनातील व्यावसायिक गटात निवड झाली होती.