कोळवण, ता. १८ : कोळवण (ता. मुळशी) येथे सह्याद्री परिवारातर्फे नुकतेच ‘श्रावण रानभाज्या महोत्सवा’चे आयोजन केले होते. यावेळी परिवारातील ३५ कुटुंबांतील सदस्यांनी डोंगर कपारीत तसेच माळरानावर आढळणाऱ्या विविध दुर्मीळ व औषधी रानभाज्यांच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
नाचणीच्या पिठाच्या रुचकर भाकरी सोबत रानभाज्यांच्या जेवणाची लज्जत वाढविल्याने अनोख्या भोजनाची अनुभूती घेतल्याचे समाधान सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. सह्याद्री परिवारातर्फे सव्वीस वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यावेळी सह्याद्री परिवारातील सदस्य हरिभाऊ धिडे, जालिंदर ढमाले, ज्ञानेश्वर धिडे, लहू लायगुडे, नारायण निबुदे, गिरीश शहा, देवा साठे, संतोष शेलार, नवनाथ जायभाय, गणेश कुडले, देवराम गवळी, लक्ष्मण दुडे, राजू उंबरकर, महादेव लायगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते
हायब्रीड अन्नधान्यापासून काहीशी सुटका
काळवणच्या डोंगर कपारीत तसेच माळरानावर विविध दुर्मीळ व आयुर्वेदिक औषधी रानभाज्यासुद्धा उगवतात. धकाधकीच्या जीवनात योग्य आहाराकडे व जेवणाच्या वेळा पाळणे अवघड बनत आहे. त्यातच रासायनिक खतांवरील हायब्रीड अन्नधान्य मिळते आहे. ते हानिकारक आहे. यातून थोडी का होईना सुटका म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यातील एक दिवस ‘श्रावण रानभाज्या महोत्सवा’चे केले जाते.
आरोग्यपूर्ण रानभाज्या
करटुले, भारांगा
चावेत, घोटवेल
कोका, कुरढू
टाकळा, भारंगाफुल
आळू, माठाचे देठ
बांबू, धापा, वाघाटी
मोहर, पातेरा, केनी
म्हसवेल, रूखवळ, चिचारडी.
श्रावण महिन्यात रानभाज्या भोजन महोत्सवाचे मागील पंचवीस वर्षांपासून आयोजन करत आहोत. सर्वच सदस्य वेगवेगळ्या गावचे असूनसुद्धा एकाच कुटुंबातील समस्यांप्रमाणे एकत्र जमून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतो. यामधून नव्या पिढीला रानभाज्या त्यांची नावे व चव याची ओळख कळते.
- जालिंदर ढमाले, सदस्य, सह्याद्री परिवार, कोळवण
02355,02353