बंद घरांवर देयकांचा बोजा
इर्शाळवाडीकरांना घरपट्टी, वीजदेयकांसाठी नोटिसा
खालापूर, ता. १८ (बातमीदार)ः इर्शाळवाडीतील घरांना चौक ग्रामपंचायतीने पाच हजारांच्या घरपट्टीची नोटीस पाठवली आहे, तर बंद घरांना महावितरणाने भरमसाट वीजदेयके पाठवल्याने डोंगराएवढ्या दुःखातून सावरणाऱ्या ग्रामस्थांवर कररूपी नवे संकट ओढावले आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या घटनेत ४३ कुटुंबातील २७ मृत आणि ५७ बेपत्ता झाले. शासनाने पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला. चौक ग्रामपंचायतीने सहा एकर गावठाण जागेत सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेली टुमदार घरे, सोयीसुविधा देताना कुठेही कमतरता ठेवली नाही. १० महिन्यांपूर्वी नवीन घरांच्या चाव्या दरडग्रस्तांना मिळाल्या. त्या घराशी जुळवून घेताना ग्रामपंचायतीने पाच हजारांच्या घरपट्टीची पाठवल्याने अनेक कुटुंबे हादरून गेली आहेत. एका हाताने आणि दुसऱ्या हाताने असा प्रकार असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे, तर वाडीतील बंद असलेल्या १० ते १२ घरांना महावितरणाने भरमसाट वीजदेयके पाठवल्याने ग्रामस्थांवर आर्थिक संकट ओढावल्याची भावना आहे.
-----------------------------------
घरही शासनाने दिली असून, स्लॅबच्या घरांऐवजी जुनी घरे बरे होती. घरपट्टी नोटिसीविरोधात ग्रामसभेत आक्षेप नोंदवला असून, सध्या घरपट्टी वसुली थांबली आहे.
- अंकुश वाघ, नानिवली इर्शाळवाडी
-----------------------------------
इर्शाळवाडी कुटुंबाच्या व्यथा जवळून अनुभवल्या आहेत. शासनाच्या नियमांप्रमाणे घरपट्टी पाठवण्यात आली आहे, परंतु त्यामध्ये सूट मिळावी, यासाठी जिल्हा परिषद ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- रितु ठोंबरे, सरपंच, चौक ग्रामपंचायत