नाशिक: बाजारपेठेत गावठी गवार, टोमॅटो व कर्टुल्याची आवक मर्यादित असल्याने या भाज्यांचे दर अधिक आहेत. करटुल्याचे दर किलोला १५० ते १८० रुपये आहेत. त्या तुलनेत कोथिंबीर, पालक, भेंडी, मेथी, काद्यांसह अन्य भाजीपाल्यांची आवक जास्त असल्याने त्यांच्या दरात घट झाली आहे.
जिल्ह्यात चालु महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ होईल, असा अंदाज होता. मात्र, बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर सध्या कमी झाल्याचे चित्र आहे. कोथिंबीर, पालक, मेथीच्या जुडीचे दर ५ ते २० रुपयांदरम्यान आहेत. तर गुजरात व जळगाव भागातून भेंडीची आवक वाढल्याने दर खाली आले आहेत.
किलोभर भेंडीचा भाव २० ते २५ रुपये आहे. सिमला मिरची २५ ते ३५ तर कारली २० ते २५ रुपये दराने विकली जात आहे. गेल्या आठवड्यापासून कांदा व बटाट्याचे दर स्थिर आहेत. बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २० ते २५ रुपये तसेच बटाट्याचे दर १५ ते २० रुपये किलो आहे.
बाजारपेठेत एकीकडे अन्य भाजीपाल्याचे दरात चढ-उतार होत असताना करटुले मात्र आजही भाव खात आहे. किलोभर करट्युल्यासाठी १५० ते १८० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे करटुलेप्रेमींच्या खिशाला झळ बसते आहे. टोमॅटोला ४० ते ५० रुपये दराने विक्री होत आहेत.
त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, नाशिकवगळता अन्य भागात सध्या पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे या भागांमधून नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आवकेच्या तुलनेत शेतमालाला उठाव दिसून येत नाही. परिणामी पुढील काही दिवस भाजीपाल्याचे दर कमीच राहतील, असा अंदाज आहे.
Agriculture Success: कोळोलीच्या सातव कुटुंबीयांची केळी इराणला रवानागावठी गवार तेजीत
गावठी गवार खुडणीसाठी अधिक कष्ट असल्याने त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. परिणामी मागणी असूनही बाजारात गवारची आवक मर्यादित आहे. सध्या ६० ते ८० रुपये दराने गवार विक्री होत आहे. परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात हे दर शंभरी गाठतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.