पुणे : खडकवासला धरणसाखळीत पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांत मिळून २८.४५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाने धरणसाखळीत १.६४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पुणे शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा केवळ चोवीस तासांत खडकवासला धरणसाखळीत जमा झाला आहे. सोमवारी ९१.९७ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा मंगळवारी ९७.५८ टक्क्यांवर गेला आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी सात वाजता ३५ हजार ३१० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातील २६ धरणांपैकी सात धरणे शंभर टक्के भरली असून, विसापूर धरण ९९.३९, पवना ९९.१५, तर नीरा देवघर धरण ९७.८५ टक्के भरले आहे. माणिकडोह धरणात आत्तापर्यंत केवळ ४४.१५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, येडगाव धरणात ७० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. चिल्हेवाडीत ७७, गुंजवणीत ८१ टक्के पाणीसाठा असून, उर्वरित सर्व धरणांमध्ये ९० टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे.
टेमघर धरण क्षेत्रात १०५ मिलिमीटर पाऊसटेमघर धरण क्षेत्रात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी टेमघर धरण ९६.३९ टक्क्यांवर होते, ते मंगळवारी शंभर टक्के भरले आहे. टेमघर धरणात ३.७१ टीएमसी पाणीसाठा असून, वरसगाव धरणक्षेत्रात ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर तर खडकवासला धरणक्षेत्रात ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरण पाऊस (मिमी) पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारीखडकवासला ५३ १.७२ ८७.००
पानशेत ९५ १०.४६ ९८.२४
वरसगाव ८९ १२.५६ ९७.९७
टेमघर १०५ ३.८१ १००