Kolhapur Newborn Death : पुराच्या पाण्याचा अडथळा, वाटेतच महिलेची प्रसुती; नवजात बालकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटनेने हळहळ
esakal August 20, 2025 03:45 PM

Kolhapur Emergency Childbirth Case : गगनबावडा तालुक्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना, पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी सुरू झालेली धडपड एका नवजात बाळासाठी मात्र अपुरी ठरली. हा हृदयद्रावक प्रसंग मंगळवारी घडला. बोरबेट (ता.गगनबावडा) येथील कल्पना आनंदा डुकरे (वय ३३ वर्षे) या गर्भवती महिलेवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी गगनबावडा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने मंगळवारी पहाटे परिस्थिती निर्माण झाली. कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ठिकठिकाणी आले. अशातच मंगळवारी सकाळी बोरबेट येथील सात महिन्यांची गर्भवती महिला कल्पना डुकरे हिला प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीतून गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण पुढील उपचारासाठी तिला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.

कोल्हापूर येथील दवाखान्यात नेताना खोकुर्लेपैकी पडवळवाडी येथे वाटेतच तिची १०२ रुग्णवाहिकेमध्ये प्रसुती झाली. सातव्या महिन्यातच अवेळी प्रसुती झाल्याने व बाळाची योग्य वाढ नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे तालुका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

Kolhapur Rain Travel Alert : कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास करताय थांबा! 'या' मार्गावरील वाहतूक बंद, जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान या गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी तिला कोल्हापुरला नेणे गरजेचे बनले होते. गगनबावडा कोल्हापूर मुख्य मार्गावर खोकुर्ले येथे पाणी असल्याने तेथून त्यांना निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना कोदेमार्गे किरवेपर्यंत नेण्यात आले. किरवे-लोंघे या दरम्यान पुराचे पाणी असल्याने निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिकेचे डॉ.स्वप्नील तमखाने व चालक सतीश कांबळे यांनी नागरिकांच्या मदतीने कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून किरवे येथील पुराचे पाणी पार करून नेले.

कळे आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. कल्पना डुकरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने दुःखाची छाया पसरली असली तरी, आईला वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेतील डॉ.स्वप्नील तमखाने आणि चालक सतीश कांबळे हे मात्र देवदूत ठरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.