रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी सोमवारी (18 ऑगस्ट) व्हाईट हाऊसला पोहोचले.
या बैठकीत भाग घेण्यासाठी अनेक युरोपियन नेतेदेखील वॉशिंग्टनमध्ये पोहोचले होते.
काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अलास्कात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे.
मात्र, त्या शिखर परिषदेतून युक्रेन-रशिया युद्धावर तोडगा निघाला नव्हता, तसंच शस्त्रसंधीदेखील होऊ शकली नव्हती.
डोनाल्ड ट्रम्प यांचे आशावादी शब्द आणि त्यांच्या युरोपियन सहकाऱ्यांचं या प्रश्नावरील काहीसं निराशावादी आकलन असूनदेखील सोमवारी (18 ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत शांतता कराराच्या दिशेनं कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही.
सोमवारी (18 ऑगस्ट) झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले.
ट्रम्प यांच्या बहुचर्चित उद्देशांपैकी एक म्हणजे झेलेन्स्की आणि पुतिन यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठकीचं आयोजन करणं. सोमवारी (18 ऑगस्ट) युरोपियन नेत्यांबरोबरच्या चर्चेआधी ते म्हणाले की आता मुद्दा हा आहे की, "अशी बैठक केव्हा होणार? ती होणारी की नाही होणारा हा मुद्दा नाही."
चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांनी पुतिन यांना फोन करून रशियन नेते आणि झेलेन्स्की यांच्यामधील द्विपक्षीय चर्चेशी निगडीत 'तयारी' सुरू करण्यास सांगितलं आहे.
ट्रम्प म्हणाले की पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठकीनंतर, एक त्रिपक्षीय बैठक होईल. ज्यात ते देखील सहभागी होतील.
पुतिन यांच्या सल्लागारानं नंतर सांगितलं की ट्रम्प आणि पुतिन यांनी सोमवारी (18 ऑगस्ट) फोनवर 40 मिनिटं चर्चा केली होती.
युरोपियन नेत्यांनी ट्रम्प यांच्याशी औपचारिक चर्चा होण्यापूर्वी ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात होत असलेला संवाद एका माइकवर रेकॉर्ड झाला.
या चर्चेत ट्रम्प यांनी पुतिन यांच्याकडे इशारा करत मॅक्रॉन यांना सांगितलं की, "मला वाटतं की त्यांना करार करायचा आहे. मला वाटतं की, ते माझ्यासाठी करार करू इच्छितात. तुमच्या हे लक्षात येतं आहे का? हे ऐकायला भलेही विचित्र वाटत असेल."
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा दोन कट्टर शत्रूंना वाटाघाटीच्या टेबलावर समोरासमोर आणणं कितपत सोप ठरेल हे पाहणं अद्याप बाकी आहे.
कित्येक महिन्यांपासून झेलेन्स्की पुतिन यांना भेटण्यासाठी दबाव टाकत आहेत.
मात्र, पुतिन यांच्याशी भेट झाल्यानंतर युद्ध थांबेल असा कोणताही इशारा झेलेन्स्की यांनी कधीही दिलेला नाही.
त्याऐवजी, त्यांना असं सिद्ध करायचं आहे की रशिया शांतता निर्माण करू इच्छित नाही आणि त्याचबरोबर पुतिन यांना अशाप्रकारच्या बैठकीमध्ये कोणताही रस नाही.
पुतिन पूर्वी म्हणाले आहेत की ते झेलेन्स्की यांना बेकायदेशीर (राष्ट्राध्यक्ष) मानतात. कारण मार्शल लॉदरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये कोणतीही निवडणूक झालेली नाही.
रशियानं पुतिन-झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय चर्चेचा विचार वारंवार फेटाळला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी रशियानं युक्तिवाद केला होता की जोपर्यंत इतर मुद्द्यांच्या बाबतीत दोन्ही देशांमधील दुरावा संपत नाही, तोपर्यंत दोन्ही राष्ट्राध्यक्षांची भेट होण्याचं कोणतंही कारण नाही.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील एक अधिकारी यूरी उशाकोव यांनी सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री अस्पष्ट वक्तव्यं दिलं. त्यात ते म्हणाले की रशिया आणि युक्रेनच्या 'शिष्टमंडळांमधील चर्चेत प्रतिनिधींचा स्तर वाढवण्याची शक्यता लक्षात घेण्यात यावी', 'हे योग्य ठरेल'.
युद्ध संपवण्यासाठी होणाऱ्या चर्चेच्या आधी कोणत्याही प्रकारच्या शस्त्रसंधीची आवश्यकता असल्याची बाब ट्रम्प यांनी फेटाळली.
आतापर्यंत युक्रेनकडून हीच मुख्य मागणी राहिली आहे - त्यांनी स्पष्ट केलं आहे की रशियाबरोबर पुढील चर्चा होण्यासाठी आणि शेवटी एखाद्या दीर्घकालीन तोडग्यापर्यंत पोहोचण्यासाठी, शस्त्रसंधी होण्याला ते एक बंधनकारक अट मानतात.
शस्त्रसंधीसाठी तयार होणं, हे संपूर्ण शांतता कराराच्या तुलनेत एका मर्यादेपर्यंत सोप ठरू शकतं. कारण एखादा करार होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात आणि या दरम्यान रशियाकडून होणारा संभाव्यपणे सुरू राहील.
शस्त्रसंधीबाबत ट्रम्प म्हणाले की, "मला वाटत नाही की हे आवश्यक आहे."
मात्र युरोपियन नेत्यांनी याला विरोध केला. त्यात सर्वात तीव्र प्रतिक्रिया जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी दिली.
मर्ज म्हणाले, "पुढील बैठक शस्त्रसंधीशिवाय होईल, या गोष्टीची मी कल्पना करू शकत नाही. आपण त्यावर काम करूया आणि रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करूया."
मात्र जेव्हा झेलेन्स्की यांना यावर बोलण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी आधीप्रमाणे शस्त्रसंधीच्या मागणीचा पुनरुच्चार केला नाही.
डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्की यांना म्हणाले की युद्ध संपवणाऱ्या कोणत्याही करारात युक्रेनच्या संरक्षणाची गॅरंटी देण्यात अमेरिका मदत करेल.
अर्थात ही मदत कोणत्या मर्यादेपर्यंत दिली जाईल, यावर ट्रम्प स्पष्टपणे काहीही बोलले नाहीत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला नाही.
मात्र पत्रकारांनी जेव्हा विचारलं की युक्रेनला अमेरिका देत असलेल्या संरक्षणाच्या गॅरंटीमध्ये अमेरिकेच्या सैन्याच्या उपस्थितीचाही समावेश असू शकतो. त्यावर ट्रम्प यांनी ते स्पष्टपणे नाकारलं देखील नाही.
ते म्हणाले, "युक्रेनला संरक्षण पुरवण्याची पहिली जबाबदारी युरोपची आहे. मात्र आम्हीदेखील यात सहभागी होऊ."
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असंही म्हणाले की, "आम्ही त्यांना चांगलं संरक्षण पुरवू."
संरक्षणाच्या गॅरंटीच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी दिलेलं हे वक्तव्य आतापर्यंतचं सर्वाधिक निर्णायक वक्तव्य मानलं जातं आहे. रशियाबरोबर कोणताही करार करण्याच्या संदर्भात हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
ते असंही म्हणाले की गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेच्या वेळेस पुतिन यांनी मान्य केलं की कोणत्याही शांतता करारात युक्रेनला संरक्षणाची गॅरंटी दिली जाईल.
सोमवारच्या (18 ऑगस्ट) बैठकींनंतर एका पत्रकार परिषदेत झेलेन्स्की म्हणाले की, अमेरिका आणि युक्रेनमधील 90 अब्ज डॉलर (जवळपास 7862 अब्ज रुपये) किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा करार, हा संरक्षणाच्या गॅरंटीचा एक भाग असेल.
ते म्हणाले, "यामध्ये अमेरिकेच्या अशा शस्त्रास्त्रांचा समावेश असेल, जी सध्या युक्रेनकडे नाहीत. उदाहरणार्थ, एव्हिएशन सिस्टम, अँटी-मिसाइल सिस्टम आणि इतर गोष्टी ज्यांच्याबद्दल मी काहीही सांगणार नाही."
झेलेन्स्की असंही म्हणाले की अमेरिका युक्रेनच्या ड्रोनची खरेदी करेल. यामुळे या ड्रोनचं देशांतर्गत उत्पादन करण्यास निधी उपलब्ध होईल.
त्यांनी पत्रकारांना सांगितलं की युक्रेन द्यायची संरक्षण गॅरंटी संभाव्यपणे 10 दिवसांच्या आत निश्चित करण्यात येईल.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये केलेल्या दौऱ्यातील कटू अनुभव लक्षात घेऊन यावेळेस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, अमेरिकन नेत्यांबरोबर सौहार्दानं वागण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी बरेच प्रयत्न करताना दिसले.
यामध्ये बैठकीआधीच्या काही मिनिटांमध्येच सहा वेळा 'आभार' मानण्याचाही समावेश होता.
गेल्या वेळेस जेव्हा झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये होते, तेव्हा युद्धकाळात अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कमी कृतज्ञता दाखवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांनी झेलेन्स्की यांना फटकारलं होतं.
फेब्रुवारी महिन्यातील बैठकीत झेलेन्स्की यांच्या पोशाखावरून देखील वाद झाला होता.
यावेळेस, झेलेन्स्की यांनी पारंपारिक लष्करी पोशाखाऐवजी गडद रंगाचा सूट परिधान केला होता.
गेल्या वेळेस झेलेन्स्की यांनी सूट न घातल्याबद्दल ज्या पत्रकारानं व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यावर टीका केली होती, त्याच पत्रकारानं यावेळेस जेव्हा झेलेन्स्की यांना त्यांच्या पोशाखाबद्दल विचारलं, तेव्हा विनोद करण्यासाठी झेलेन्स्की पूर्णपणे सज्ज होते.
पत्रकारानं त्यांना सांगितलं की ते 'रुबाबदार' दिसत आहेत. तेव्हा झेलेन्स्की म्हणाले की पत्रकारानं गेल्या वेळेस घातला होता, तोच 'सूट' घातला आहे.
झेलेन्स्की यांचं हे वक्तव्य ऐकून खोलीत असलेले पत्रकार, ट्रम्प आणि इतर अधिकारी हसले. झेलेन्स्की म्हणाले, "तुम्हाला दिसतंय, त्याप्रमाणे मी बदललो आहे."
या बैठकीच्या वेळेस झेलेन्स्की यांनी कौटुंबिक संबंध निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.
त्यांनी युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्की यांच्याकडून अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांना लिहिलेलं पत्रदेखील दिलं. ते ट्रम्प यांना म्हणाले की "हे तुमच्यासाठी नाही, ते तुमच्या पत्नीसाठी आहे."
याच प्रकारे, इतर युरोपियन नेत्यांनी देखील बहुपक्षीय बैठकीच्या आधी ट्रम्प यांची खूप स्तुती केली.
ट्रम्प यांना भेटल्यावर नाटोचे प्रमुख मार्क रुट म्हणाले, "मी तुमच्या नेतृत्वासाठी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो."
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या की ट्रम्प यांच्यामुळे काहीतरी बदल झाला आहे.
वातावरणात उत्साह असला तरीदेखील युरोपियन नेत्यांनी हेदेखील मांडण्याचा प्रयत्न केला की भविष्यात रशियाकडून होणाऱ्या धोक्यासंदर्भात त्यांनादेखील असुरक्षित वाटतं आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इतर नेत्यांना गंभीर स्वरात सांगितलं की, "ज्यावेळेस आपण संरक्षणाच्या गॅरंटीबद्दल बोलतो, तेव्हा आपण युरोप खंडाच्या संरक्षणाबद्दल देखील बोलत असतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)