'बुलेट ट्रेनच्या कामांमुळे भिंती हादरतात, तडे जातात; घरात लहान मुलं खेळतात, झोपतात त्यांची काळजी वाटते'
BBC Marathi August 20, 2025 03:45 PM
Shahid

मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातील जलसार या भागातील काही रहिवासी सध्या भीतीच्या वातावरणात राहत आहेत. कधी त्यांच्या घरांच्या खिडक्या जोरजोरात वाजतात तर कधी दरवाजा जोरात आपटतो.

तर कधी छतावरील पत्र्याचा आवाज येतो तर कधी पंखा आपोआप हलायला लागतो आणि यामुळेच इथल्या रहिवाशांची सध्या झोप उडाली आहे.

इतकंच नाही तर इथल्या अनेक घरांना तडे गेले आहेत. काहीच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर काहींना आपलं घर कधीही कोसळेल अशी भीती वाटत आहे.

आम्ही जलसार ग्रामपंचायतीतल्या करईपाडा याठिकाणी पोहचलो तेव्हा तिथल्या आणि आसपासच्या पाड्यांमधील रहिवाशांनी हा अनुभव सांगितला.

या भागात बुलेट ट्रेनसाठी बोगद्याचं काम सुरू असून त्यासाठी होणाऱ्या स्फोटांमुळे असे अनुभव येत आहेत. त्यांच्या घरांचं नुकसान झाल्याची तक्रार गावकरी करत आहेत.

'भिंत कोसळली तर जीव जाऊ शकतो'

जलसार ग्रामपंचायतीत पाच ते सहा पाडे येतात. इथल्या करईपाडा येथील कैलास पाटील यांच्या घरी आम्ही पोहचलो. घराच्या प्रवेशद्वाराजवळच लोखंडी खांब लावले आहेत. आजूबाजूला काही भेगा पडलेल्या दिसतात.

तर घराच्या आतमध्येही अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेलेत. काही ठिकाणी आरपार दिसेल इतके तडे आहेत.

कैलास पाटील मिळेल तसं मजुरीचं काम करतात. तर त्यांची पत्नी स्वप्नाली ह्या मुंबईत दादरमध्ये भाजी विकण्यासाठी जातात. घरात आठ वर्षांचा मुलगा आपल्या आजीसोबत राहतो.

आम्ही घाबरून दररोज घराबाहेर पडतो, आवाजाने मुलगा सुद्धा घराबाहेर जातो असं स्वप्नाली सांगतात. इतकंच नाही तर झोपेतला माणूसही उठेल एवढ्या जोरात आवाज येतो असंही त्या सांगतात.

Shahid

स्वप्नाली पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एवढा आवाज येतो की झोपलो असेल तरी झोपेतला माणूस उठेल एवढ्या जोरात आवाज येतो. बिछान्यावर झोपलो असू तर बिछाना हलतो. एवढ्या जोराने स्फोट होतो. कधी रात्री, दुपारी, सकाळी त्यांचं काही टायमिंग नाही. आठ वर्षांचा मुलगा आहे. तो पण एवढा घाबरतो की तो घराच्या बाहेर पडतो."

केवळ हीच भीती नाहीये तर घरांचंही नुकसान होत असून त्यासाठी पूर्ण भरपाई दिली पाहिजे अशी मागणी त्या करतात.

त्या म्हणाल्या, "जेव्हापासून हे बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं आहे तेव्हापासून जे स्फोट होतात यामुळे घराला तडे गेले आहेत. टाईल्स फुटल्या आहेत. घर पडण्याची शक्यता आहे. आम्ही पोलीस तक्रार केल्यानंतर हे लावून दिलं आहे. काही पडलं तर सासू घरात राहते. छोटा मुलगा आहे. आम्ही नवरा बायको दोघं कामाला जातो. पडलं तर किती आमचं नुकसान होईल याची त्यांना कल्पना नाहीये. आम्ही कामावर गेलो तर आम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटतं. स्फोट झाला आणि भिंत पडली तर किती नुकसान होईल? जर छत पडलं तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो."

जलसार ग्रामपंचायतीअंतर्गत काही आदिवासी पाडे सुद्धा आहेत. आम्ही त्याठिकाणी गेलो त्यावेळी आमची भेट 52 वर्षीय सुंदर पितांबर धोदडे यांच्याशी झाली.

गेल्या काही महिन्यांपासून जोरजोरात येणाऱ्या आवाजाने त्या हैराण तर आहेतच पण त्यांच्याही घरातील भीतींना, लाद्यांना तडे गेल्याचं त्यांनी दाखवलं. मोलमजुरी करून पोरं पैसे कमवतात आता हे नुकसान आम्ही कसं भरून काढणार? असं त्या म्हणाल्या.

Shahid

कुठलाही प्रकल्प सुरू असला तरी त्याचा आम्हाला काय फायदा आहे उलट नुकसानच होतंय असंही त्या संतापात सांगत होत्या.

सुंदर धोदडे यांनी सांगितलं, "आमच्या घराला फाटे (भेगा पडल्या) गेलेत. जिकडे तिकडे कडप्प्यांना भेगा पडल्या, लाद्या फाटल्या आहेत. आता बसवणार कशाने? एवढा पैसा पाहिजे ना आपल्याजवळ. मुलं कुठे थोडं थोडं काम करून भागवतात. ते कशाने आपण दुरुस्त करणार. तसंच आहे. अख्ख्या घराचं नुकसान झालं. ते कसं चांगलं करणार?"

आवाजाने घाबरायला होतं असंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "जोराने आवाज येतो. दणकल्यासारखं. झोपेत पण. ते कधी पण फोडतात. आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगितलेलं. पण सर्व्हे करायला कोणीही आलेलं नाही."

सुंदरा यांनी सांगितलं की, वारंवार सांगूनही आमच्या घराचा सर्व्हे झालेला नाही. इकडे कोणीही फिरकलं नाही अशीही तक्रार त्यांनी केली.

"आमच्याकडे सर्व्हे करा सांगितलं तेव्हापासून आलेच नाही. एवढे वर्ष कधीही घराला फाटे गेले नाहीत आताच गेले. कोणीही सर्वे करायला आले आहे. भीती वाटते. मुलं झोपली असलेली असताना कोणाच्या अंगावर पडलं तर आम्ही काय करणार? प्रकल्पाचा आम्हाला कसला फायदा. नुकसान करून जातात त्यात फायदा कसला आला." असंही त्या म्हणाल्या.

'आम्हाला पूर्वसूचना किंवा नोटीस दिलेली नव्हती'

24 डिसेंबर रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता पहिला ब्लास्ट झाला आणि जणू काही भूकंप आल्यासारखं वाटलं, असं हरीशचंद्र घरत यांनी सांगितलं.

जलसार ग्रामपंचायतीतील दारशेतपाड्यात ते राहतात. ते एक शेतकरी आहेत आणि त्यांचा कुक्कुटपालनाचाही व्यवसाय आहे.

आपल्या घराच्या खिडक्या आवाजाने कशा हादरतात त्याचा एक व्हिडिओही त्यांनी रेकॉर्ड केलेला आम्हाला दाखवला.

हरीशचंद्र घरत म्हणाले, "आमच्या हद्दीत बुलेट ट्रेनचा मोठा प्रकल्प चालू आहे. गावकऱ्यांना कोणतीही सूचना न देता 24 डिसेंबरला पहिला ब्लास्ट केला. ग्रामपंचायत, लोकांना काही माहिती नाही. एवढा ब्लास्ट केला त्याची तीव्रता एवढी होती की जणू काही भूकंप झाला. माझ्या घरात लहान मुली होत्या त्या किंचाळत उठल्या. भूकंप झाला का काय झालं पाहिलं तर ग्रामपंचायतने कळवलं की ब्लास्ट झाला. पोलीस स्टेशन, प्रांत, डिवायएसपी सगळ्यांना कळवलं."

Shahid

गेल्या काही महिन्यात घरांच्या भिंतीच्या भेगा मोठ्या झाल्या अशीही तक्रार त्यांनी केली आहे.

ते म्हणाले, 'ब्लास्ट सुरू झाल्यापासून माझ्या आणि इतरांच्या घरांना थोडं थोडं करून एवढ्या मोठ्या भेगा पडल्या. या घराच्या टाईल्स तुटल्या. विंडो हलतात. पत्रे हलतात. सहा महिने झाले कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रत्येक घरांना क्रॅक गेलेत. फाऊंडेशन नादूरूस्त झालेलं आहे. ब्लास्टची तीव्रता एवढी आहे की घरं हलतात. घराच्या भींती हलतात. खिडक्या हलतात. या लोकांनी ब्लास्ट करायच्या आधी कोणतीही सूचना दिलेली आहे. असं होणार आहे बोगदा पाडणार आहे त्यातून असा असा त्रास होईल अशी कोणालाही नोटीस दिलेली नाही. ते फक्त सांगतात एवढच सांगतात की करू. त्यांच्या ऑफिसला 100 वेळा तरी फेऱ्या मारल्या आहेत. पाचशे ते साडे पाचशे मीटर अंतर आहे."

संबंधित यंत्रणेने किंवा प्रशासनाने तरी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या कामाविषयी माहिती देणं अपेक्षित होतं, असंही ते म्हणाले.

हरीशचंद्र घरत सांगतात, "पूर्व सूचना द्यायला हवी होती की तुमच्या गावात आम्ही बोगद्याचं काम करतोय तुम्हाला हा त्रास होईल किंवा नाही होईल परंतु तुम्ही लक्ष ठेवा."

'आमचं नुकसान करून विकासाची कामं करणार तर आमचे लोक विचार करणारच'

यासंदर्भात आम्ही जलसार ग्रामपंचायतीचे उपसरपंच वेंकोश म्हात्रे यांना भेटलो. त्यांनीही ब्लास्टिंगबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचं सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना वेंकोश म्हात्रे म्हणाले, "डिसेंबरपासून ब्लास्टिंगला सुरुवात झाली. हा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे. मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तेव्हापासून उत्साहाचं वातावरण होतं परंतु ब्लास्टिंग सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. ब्लास्टिंगपासून त्रास होतो, ब्लास्टिंग होतं तेव्हा भेगा जायला लागल्या. मग वेळोवेळी आम्ही त्या ऑफिसला गेलो. पाठपुरावा केला. त्यांनी पत्र दिलं की, आताचं नुकसान आणि नंतरचं आम्ही देऊ अशी ग्वाही दिली. नंतर सर्वे सुद्धा झाला. परंतु 151 च्या यादीत केवळ 65 अप्रूव्ह झाले. त्यातही फक्त भेगा पडल्या त्याची भरपाई इतकंच होतं. याला गावकऱ्यांनी विरोध केला."

Shahid

केवळ भेगा पडलेल्या आहेत तिथलंच दुरुस्तीचं काम करून देणार असल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्याचं ते सांगतात. कारण घरांचा पाया हलला आहे, यासाठी सर्वेक्षण सर्वांचं व्हायला हवं आणि नुकसान भरपाई सुद्धा अपेक्षित हवी असं ते सांगतात.

यासंदर्भात ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसंच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

"एखाद्याचा हात तुटल्यानंतर ते जॉईंट टू जॉईंट असतं. घराचं पण ते एकदा हादरलं किंवा त्याला जो प्रॉब्लेम झाला त्याचं लाईफ कमीच झालं ना. त्यापद्धतीने स्पेशल कम्पनसेशन आलं नाही. त्यानंतर आम्ही पत्र व्यवहार केला. बैठकही झाली आता. कंपनी, बुलेट ट्रेन, तेव्हा त्यांनी शब्द दिला की नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यांनी आश्वासन दिलं आहे," असंही म्हात्रे यांनी सांगितलं.

परंतु या कामाबाबत किंवा ब्लास्ट होतील याची सूचना किंवा नोटीस न दिल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. घरोघरी नोटीस लावतात ते करायला पाहिजे होतं. आम्हाला यातलं ज्ञानच नव्हतं. ब्लास्ट चालू झाल्यानंतर असा हा आवाज आहे, हादरे किंवा आणखी काही विषय होईल तेव्हा नोटीस द्यायला पाहिजे होती. तीन चार वर्षांपासून आम्हाला विश्वासात घेतला पाहिजे होतं."

ते पुढे सांगतात, "तीस-चाळीस वर्षं सरकारी नोकरदार यांनी घरासाठी पैसा लावला. शेतकरी मजूर आहेत त्यांनी छोटी मोठी घरं बांधलेली आहे. मेहनत करून घरं बांधली आहेत. मग हा प्रोजेक्ट येतो. आमचा प्रोजेक्टला विरोध नाही पण आमचं नुकसान करून विकासाची कामं करणार तर आमचे लोक विचार करणारच. कारण माझं घर मोडून विकासाची कामं होणार असं तर होणार नाही ना."

वन्यप्राण्यांचा अधिवासही धोक्यात?

पालघर जिल्ह्यात विविध आदिवासी पाड्यांमध्ये काम करणाऱ्या आदिवासी समाजन्नोती सेवा संस्थेने इथल्या वन्यप्राण्यांच्या दैनंदिन अधिवास धोक्यात आल्याचा मुद्दा मांडला आहे. यासंदर्भात त्यांनी वन विभाग आणि जिल्हाधिकारी प्रशासनालाही पत्र लिहिल्याचं ते सांगतात.

या संस्थेचे प्रमुख सागर सुतार यांनी सांगितलं की, "बुलेट ट्रेन हा प्रकल्प या पट्ट्यातून जातोय. बऱ्याच ठिकाणी वाहनांची गर्दी, बोगद्यासाठी जे काम होतंय यामुळे पर्यावरण, वन्यप्राणीजीव आणि पक्षी यांचा रोजचा अधिवास धोक्यात आलेला आहे. शिवाय जे स्थानिक रहिवासी यांच्या घरांना हादरे बसतायत. घरं फाटलेली आहे. आदिवासी लोकवस्ती आहेत. हातावर पोट घेऊन चालणारी मंडळी आहे. यांच्या घराचं ऑडीट यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत."

Shahid

ते पुढे सांगतात, "आजूबाजूचा जो परिसर आहे तो संरक्षित आणि राखीव वनाच्या पट्ट्यातून आहेत. यात जे ब्लास्ट होतायत आणि त्यातून जे वन्यजीव प्राणी पक्षी आहेत हे त्यांचं रोजचा जीवनक्रम बदलून ते लोकवस्तीत शिरतायत. यासाठी ते मेनरोड क्रॉस करतायत. अशा घटना घडलेल्या आहेत की रानमांजरं, कोल्हे, डुकरं हे वाहनांचे धक्के लागून मेलेले आहेत. काहीबाबतीत आम्ही हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे. वन्यप्राणी रात्री शिकारीला निघतायत. तिथे स्फोट होतायत. यामुळे ते घाबरून स्थानीक वस्तीत शिरत आहे. यात रानमांजर, कोल्हे, छोटे मोठे ससे आहेत. सायले आहेत. ते खाली उतरत आहेत."

"माणसाचं झालेलं नुकसान शासनाकडून येणारं नुकसान भरपाईने भरूघेल. परंतु पर्यावरण आणि वन्य प्राण्यांचं नुकसान कसं भरून काढणार?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वन्य प्राण्यांच्या अधिवासाच्या सुरक्षिततेबाबत बीबीसी मराठीने वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची बाजू आल्यानंतर अपडेट करण्यात येईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाने काय सांगितलं?

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये काम सुरू आहे. यात वसई, डहाणू,पालघर आणि तलासरी हे भाग येतात. पालघरचे उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "बुलेट ट्रेनसाठी बोगद्याचं काम सुरू असून कंट्रोल ब्लास्टिंगसाठी परवानगी घेण्यात आली होती. आमच्याकडे ग्रामस्थांची तक्रार आल्यानंतर बैठक घेतली आहे. संबंधित खासगी कंपनी आणि बुलेट ट्रेन यंत्रणेलाही सूचित केलं आहे. संबंधित कंपनीला आम्ही पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. तसंच नुकसान झालेल्या घरांचं सर्वेक्षण 18 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेलं आहे."

तर वन्यप्राण्यांच्यासंदर्भात माहिती घेऊन बोलतो असंही त्यांनी सांगितलं.

Shahid

नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवरती दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातला बुलेट ट्रेनचा पहिला प्रकल्प आहे असून याची लांबी 508 किलोमीटर इतकी आहे.

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातून सुरू होणारी 320 किमी/ताशी वेगाने धावणारी ही ट्रेन ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणि, अहमदाबाद अशा दहा शहरांमध्ये थांबेल आणि साबरमती येथे शेवटचा थांबा असेल.

हा संपूर्ण प्रवास काही मर्यादित थांब्यांसह सुमारे 2 तास 7 मिनिटांचा असेल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत कर वगळून 1,08,000 कोटी रुपये म्हणजे 17 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

एनएचआरसीएलच्या प्रवक्त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत या भेगा पडण्याचं कारण शोधून काढण्यासाठी तंत्रज्ञांची टीम स्थापन केल्याचं सांगितलं.

एका त्रयस्थ तंत्रज्ञांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ते या गोष्टीचं निरीक्षण करुन त्यामागची कारणं, त्यामुळे झालेल्या नुकसान याचा आढावा घेतील.

त्यांनी काढलेल्या निरीक्षणांवर पुढील कार्यवाही करण्यात येईल. सध्या प्रभावित झालेल्या घरांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे, असं या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'आपले', 'त्यांचे' की 'सर्वांचेच'? या प्रश्नाचा वेध घेणारे नाटक - 'भूमिका'
  • मुस्लीम बहिष्कार? : 'सलोख्याचा प्रांत' असलेल्या महाराष्ट्रात धार्मिक तणावाच्या घटना का घडत आहेत?
  • 'पैसा, विमा मिळत राहील, पण गेलेल्या माणसाचं काय?', दहीहंडीत पोटची पोरं गमावलेल्यांच्या व्यथा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.