- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
बारावीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपुढे अनेक पदवी अभ्यासक्रमांची दारे खुली होतात. त्यापैकी बीबीए (बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) आणि बीकॉम (बॅचलर ऑफ कॉमर्स) हे दोन मुख्य पर्याय आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांचे स्वरूप, अभ्यासाची दिशा, करिअर संधी व पुढील शिक्षण यामधील काही महत्त्वाच्या फरकांची सविस्तर माहिती आजच्या लेखात घेऊयात.
बीकॉम – पारंपरिक आणि मूलभूत अभ्यासक्रम
बीकॉम हा पारंपरिक पदवी अभ्यासक्रम असून तो वाणिज्य क्षेत्रातील मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे. यात मुख्यतः लेखाकीय ज्ञान, आर्थिक व्यवहार, कर प्रणाली, बँकिंग, विमा, व्यवसाय कायदे, सांख्यिकी आणि अर्थशास्त्र अशा विषयांचा समावेश असतो.
कालावधी, पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया
बीकॉम हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतो. काही महाविद्यालये गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश देतात तर काही महाविद्यालये थेट प्रवेशही देतात. शैक्षणिक शुल्क शासकीय व निमशासकीय महाविद्यालयांत कमी असते, तर खासगी महाविद्यालयांत अधिक असते.
बीबीए – व्यवस्थापन व नेतृत्वकौशल्यांचा अभ्यास
बीबीए हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून यात व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्व, व्यवसाय धोरण, मार्केटिंग, मानवी संसाधन व्यवस्थापन, व्यवसाय संवाद, उद्योजकता, वित्त व्यवस्थापन इत्यादी विषय शिकवले जातात. काही ठिकाणी बिझनेस अॅनालिटिक्स, इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, इंटरनॅशनल बिझनेस, बँकिंग अँड फायनान्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशी स्पेशलायझेशन्स उपलब्ध असतात.
विषयांची रचना व अभ्यासाचे स्वरूप
बीकॉममध्ये आर्थिक संकल्पना, लेखाशास्त्र, व्यावसायिक कायदे, कराधान, बँकिंग, विमा हे विषय मुख्य असतात. तर बीबीएमध्ये व्यवस्थापन, विपणन, वित्त, मनुष्यबळ विकास, उत्पादन व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे विषय शिकवले जातात. बीकॉमचा कल पारंपरिक व्यवसायविषयक शिक्षणाकडे असतो तर बीबीएचा भर आधुनिक उद्योगधंद्यांतील व्यवस्थापन कौशल्यांवर असतो.
करिअर संधी आणि पुढील शिक्षणाचे पर्याय
बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी लेखापाल, आर्थिक विश्लेषक, लेखा परीक्षक, बँक कर्मचारी, विमा सल्लागार अशा विविध क्षेत्रात नोकरी करू शकतात. याशिवाय बीकॉम केल्यानंतर एमकॉम, चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट, सीएफए, सीएमए यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतात.
बीबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना बिझनेस मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, एचआर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, उद्योजक अशा पदांवर काम करण्याची संधी मिळते. बीबीए नंतर एमबीए, पीजीडीएम किंवा इतर व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम केले जातात. शिवाय कायद्याचे (लॉ) शिक्षण दोन्ही पदवीनंतर घेता येते.
कोणासाठी कोणता कोर्स योग्य?
आर्थिक संकल्पना, लेखाशास्त्र, कर प्रणाली यामध्ये रस आहे, सीए, सीएमए किंवा बँकिंग क्षेत्रात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी बीकॉम हा चांगला पर्याय आहे. उद्योग व्यवस्थापन, नेतृत्व, संघटन कौशल्य आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये रस आहे त्यांच्यासाठी बीबीए अधिक योग्य ठरतो. सर्वसाधारणपणे बीबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला पगार थोडासा जास्त असतो, परंतु बीकॉमनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांनाही उत्तम वेतन व पदं मिळू शकतात.
निष्कर्ष
बीबीए आणि बीकॉम हे दोन्ही अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्याने आवड, कौशल्ये, करिअरची दिशा व ध्येय लक्षात घेऊन योग्य कोर्सची निवड करावी. योग्य निवड ही यशस्वी करिअरचे पहिले पाऊल असते.