काल दिवसभरात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर
राधानगरी धरणातून ११,५०० क्यूसेक, काळम्मावाडी धरणातून २० हजार क्यूसेक विसर्ग
अलमट्टी धरणातून १.७५ लाख क्यूसेक पाणी सोडले जात आहे
कोल्हापूर–सांगलीत पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाशी समन्वय
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करा.
Collector Amol Yedge : कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीसह विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तरीही पूरस्थिती नियंत्रणात असून प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, काल दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ६६ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये पाणीपातळी वाढली असून पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान, धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरणातून ११,५०० क्यूसेक आणि काळम्मावाडी धरणातून तब्बल २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच अलमट्टी धरणातून १ लाख ७५ हजार क्यूसेक पाणी विसर्ग होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, “कोल्हापूर आणि सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनामध्ये सातत्याने समन्वय साधला जात आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सतत सज्ज आहे.”
तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू
तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. ओरोस अर्थात सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट होय. तथापि गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावरील देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो ही मार्ग, पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आंबोली मार्गेच तळकोकण व गोव्याकडे जाता येईल याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.