राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील तीन दिवसांच्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आता पुढील तीन तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आलंय. पुढील 3-4 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत रिमझिम पाऊस कायम आहे. वाहतूक सुरळीत झालीये. मात्र, आता पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रिमझिम पाऊस सुरू. काल मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले, वाहतूक कोंडी देखील झाली होती. मात्र, आज पहाटेपासून पावसाचा जोर कमी असून रस्त्यांवर वाहतूक सुरळीत सुरू आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तसा इशाराही देण्यात आलाय.
वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरूच आहे. दोन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून, शहरातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत. नालासोपारा पूर्व पश्चिम भाग वसई पूर्व पश्चिम विरार पूर्व पश्चिम भाग पाण्याखाली गेला आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जीवनदानी मंदिर ट्रस्टकडून जेवणाचे वाटप करण्यात आले.
मरीन ड्राईव्हवर समुद्राच्या उंच लाटा बघायला मिळत आहेत. प्रशासनाकडून समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आलंय. मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या उंच उंच लाटा दिसत आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने परिसरात शुकशुकाट आहे. नेहमी गर्दी असणाऱ्या मॉर्निंग वॉकसाठी नागरिक व पर्यटकांचा अभाव दिसतोय. आज पावसाचा जोर कमी आहे पण समुद्र अजूनही खवळलेला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येतंय. राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसतोय. धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात देखील वाढ झालीये.