कासा, ता. १९ (बातमीदार) : हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारीच (ता. १८) पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासूनच डहाणू तालुक्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे डहाणू-जव्हार राज्य मार्गावरील आशागड, कांडोल पाडा, गंजाड, रानशेत, चारोटी, कासा, वेती वरोती या गावांमधील रस्ते पाण्याने भरले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गंजाड रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे डहाणू-कासा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. तसेच मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील रस्त्यावर नदीसदृश पाणी साचण्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या ठिकाणी पूर्वी मोठा नाला होता, मात्र तो बुजवून रस्ता बांधल्याने पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. परिणामी पुलाखाली तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून, भविष्यात मोठे जलमार्ग तयार न केल्यास सर्व वाहतूकदारांना नियमित त्रास सहन करावा लागेल.
चारोटी-सारणी मार्गावरही दीड फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहनांंना अडथळा निर्माण झाला. चारोटी नाका परिसरात गुलझारी नदीला पूर आल्याने अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले. तसेच कासा बाजारपेठेत गटारांच्या खराब व्यवस्थेमुळे एक ते दीड फूट पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे दुकाने व घरांमध्ये पाणी गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
जोरदार पावसामुळे शासकीय सुट्टी असल्याने शाळा आणि वाहने बंद असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ आणि वाहतूक गोंधळ टळला, मात्र रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
गटार नसल्याचा फटका
कासा बाजारपेठेतील दुकानांसह घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील या बाजारपेठेत रस्त्यालगत गटारे नसल्याचा परिणाम आज नागरिकांना भोगावा लागत आहे.